केंद्र सरकारची दूरचित्रवाहिन्यांसाठी मार्गदर्शिका प्रसारित !
नवी देहली – केंद्रीय माहिती आणि प्रसार मंत्रालयाने देशातील सर्व दूरचित्रवाणी वाहिन्यांना मार्गदर्शिका जारी केली आहे. यात या वाहिन्यांच्या कार्यक्रमांतून हत्या, शारीरिक आक्रमणे, मृतदेह आदी त्रासदायक गोष्टी दाखवणे बंद करावे, असे म्हटले आहे.
Centre issues advisory to #TV channels over ‘distasteful’ content, directs them to strictly follow #Broadcast laws.https://t.co/P3X3ZyJ0yA
— TIMES NOW (@TimesNow) January 9, 2023
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शिकेत म्हटले आहे की,
१. सामाजिक माध्यमांतून प्रसारित होणारे हिंसक व्हिडिओ कोणतेही संकलन न करता प्रसारित केले जात आहेत. याचा महिला आणि मुले यांच्यावर वाईट परिणाम होत आहे.
२. व्यक्तींचे मृतदेह आणि सर्वत्र रक्ताचे डाग, हिंसा, अपघात आणि घायाळ झालेल्यांचे चित्रण अन् छायाचित्रे दाखवणे त्रास देणारे आहे. अशा हिंसात्मक आणि अस्थिर करणार्या वृत्तांचा मुलांच्या मनावर वाईट परिणाम होत आहे.
३. मंत्रालयाने या मार्गदर्शिकेमध्ये काही घटनांच्या प्रसारणाचाही उल्लेख केला आहे. याद्वारे मृतदेह, रक्त, हिंसा घडत असतांना दाखवण्यात आले होते. यातील काही वृत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
अ. ३० डिसेंबर २०२२ : अपघातात घायाळ झालेल्या क्रिकेट खेळाडूचा दुःखदायक व्हिडिओ संकलित न करता आणि केवळ धुसर करून दाखवला.
आ. २८ ऑगस्ट २०२२ : एका व्यक्तीचा मृतदेह खेचून नेतांना दाखवण्यात आले. त्या वेळी सर्वत्र रक्ताचे डाग पडत असल्याचे दिसत होते.
इ. ६ जुलै २०२२ : पाटलीपुत्र येथे एका शिकवणी वर्गामध्ये एक शिक्षक ५ वर्षांच्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण करत असतांना दाखवले. तसेच या घटनेचा व्हिडिओ आवाज न ऐकवता दाखवण्यात आला. या वेळी हा मुलगा दयेची भीक मागतांना किंचाळतांना दिसत होता. हा व्हिडिओ ९ मिनिटे दाखवण्यात आला.
ई. १६ मे २०२२ : कर्नाटकच्या बागलकोट जिल्ह्यात एक महिला अधिवक्त्याला शेजार्याने मारहाण केली, ते दाखवण्यात आले.
उ. ४ मे २०२२ : तमिळनाडूच्या राजापलायम येथे एका व्यक्तीने स्वतःच्या बहिणीची हत्या केली. हत्या करतांनाचा व्हिडिओ दाखवला.
ऊ. १ मे २०२२ : छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीला झाडाला उलटे लटकावून ५ लोक त्याला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ दाखवला.
संपादकीय भूमिकाहे सरकारला का सांगावे लागते ? दूरचित्रवाहिन्यांना का कळत नाही ? समाजाला विकृत आणि वाईट गोष्टी दाखवून समाजाची नैतिकता अन् मानसिकता बिघडवणार्या अशा वाहिन्यांना शिक्षा करणे आवश्यक ! |