शासकीय कार्यालयातील कामकाजांच्या वेळांचे मोठे फलक लावा ! – वाहतूक मित्र मधुकर शेंबडे

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा, १ जानेवारी (वार्ता.) – महाराष्ट्र शासनाच्या वतीने १ जानेवारी २०२० पासून सर्व शासकीय कार्यालयांच्या वेळा पालटण्यात आल्या आहेत. शासकीय कामकाजाचा आठवडा आता ५ दिवसांचा झाला आहे; मात्र पालटण्यात आलेल्या कामकाजांच्या वेळांचा फलक जिल्हा परिषद कार्यालय वगळता इतर कोणत्याही ठिकाणी लावण्यात आलेला नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांची ससेहोलपट होत असून हे थांबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सर्व सरकारी कार्यालयांत कामकाजाच्या वेळा लिहिलेले मोठे फलक लावावेत, अशी मागणी वाहतूक मित्र मधुकर शेंबडे यांनी प्रसिद्धीपत्रकारद्वारे केली आहे.

शासकीय कार्यालयांच्या कामकाजाच्या वेळा सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशा करण्यात आल्या आहेत. शासकीय कर्मचार्‍यांना भोजनासाठी दुपारी १.३० ते २ ही वेळ देण्यात आली आहे; मात्र या वेळांचे पालन होतांना दिसत नाही. सामान्य नागरिकांना कार्यालयीन कामकाजाच्या वेळा ठाऊक नसल्यामुळे सरकारी कर्मचारी त्यांना उडवा-उडवीची उत्तरे देतात. सामान्य नागरिकांना होणारा मानसिक त्रास त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम हे सर्व वाचण्यासाठी शासकीय कार्यालयांनी आपल्या कार्यालयाच्या कामकाजाची वेळ आणि भोजनाची वेळ लिहिलेले मोठे फलक कार्यालयात लावणे आवश्यक आहे.

संपादकीय भूमिका

वाहतूक मित्रांना शासकीय कार्यालयातील कामकाजांच्या वेळांचे फलक लावा, असे सांगावे लागणे, प्रशासनाला लज्जास्पद नव्हे का ?