खलिस्तानी कट्टरतावाद, मतांतरण, व्यसनाधीनता यांच्याशी लढणार्या पंजाबला परत एकदा जागरूक करण्याची वेळ आली आहे. याविषयीचा ऊहापोह करणारा लेख…
१. पंजाबमध्ये परत काळ्या कालखंडाची पुनरावृत्ती होत असल्याचे संकेत
पंजाबमध्ये अलीकडच्या काळातील काही घटना पाहिल्या, तर त्यात वर्ष १९७९ पासून १९८४ च्या कालखंडाची झलक दिसून येते. पंजाबमध्ये ‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती’पासून हिंसाचाराच्या मार्गाने वेगळ्या खलिस्तानचे स्वप्न पहाणार्यांची सर्व पाऊले त्याच दिशेने पडत आहेत, जे पंजाबच्या काळ्या दिवसांमध्ये होत होते. ‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती’ने १ डिसेंबर २०२२ पासून ज्या शीख कैद्यांची सुटका करण्याचे अभियान चालू केले आहे, ते दुसरे तिसरे कुणी नसून माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांचे मारेकरी आणि बाँबस्फोट केलेले दोषी आहेत. काही दिवसांपूर्वी एका मंदिराच्या बाहेर धरणे आंदोलन करत असतांना पंजाबमध्ये शिवसेनेचे नेते सुधीर सुरी यांची अनेक पोलिसांच्या उपस्थितीत हत्या करण्यात आली. सुरी हिंदु देवतांच्या मूर्तींचा अवमान केल्याच्या आणि त्यांच्याविषयी अपशब्द वापरल्याच्या विरोधात धरणे आंदोलन करत होते. तेव्हा डझनभर पोलिसांच्या उपस्थितीतच त्यांची हत्या करण्यात आली. घटनास्थळावरून पकडण्यात आलेला आरोपी संदीप सिंहची चौकशी झाली, तेव्हा काही वादग्रस्त चित्रफीती समोर आल्या. त्यात संदीप सिंह हा ‘वारिस पंजाब दे’ नावाच्या खलिस्तान समर्थक संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह याच्यासह दिसून येतो. अमृतपाल याने संदीप सिंहच्या समर्थनार्थ विधान केले, तसेच त्याच्या कुटुंबाचे दायित्व घेण्याचे आश्वासन दिले. तरीही पंजाब पोलिसांचे अमृतपालची चौकशी करण्याचे धाडस होत नाही.
सुधीर सुरी यांच्या हत्येनंतर काही दिवसांनी फरीदकोटमध्ये एका डेरा संप्रदाय समर्थकाची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. त्याच्यावर ‘श्री गुरुग्रंथ साहिब’ यांचा अवमान केल्याचा आरोप होता. या हत्येच्या काही दिवसांपूर्वी फरीदकोटमध्येच अमृतपाल याने एक मोर्चा काढला होता. त्यात त्याने शीख तरुणांना न्याय व्यवस्थेवर विश्वास न ठेवता श्रद्धास्थानांचा अवमान करणार्यांवर स्वत: कारवाई करण्याचे आणि शिखांचे राज्य स्थापन करण्याचे आवाहन केले होते. या हत्या वर्ष १९७९ च्या काळातील जनरल सिंह भिंद्रनवालेच्या समर्थकांनी केलेल्या त्यांच्या वैचारिक-राजकीय प्रतिस्पध्र्यांच्या हत्यांप्रमाणेच आहेत.
निरंकारी बाबा गुरुचरण सिंह यांची हत्या करणारा रंजित सिंह हाही भिंद्रनवालेचा खास माणूस होता. तेव्हाही पोलीस भिंद्रनवालेवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते. जेव्हा केव्हा कारवाई करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा भिंद्रनवालेने मेहता चौक गुरुद्वारा आणि नंतर अकाल तख्त साहिबमध्ये स्थान निर्माण केले अन् सरकार काही करू शकले नाही.
२. पंजाबमध्ये अमृतपाल याला भिंद्रनवालेच्या स्वरूपात पुढे आणण्याचा प्रयत्न
अलीकडेच एका दिवसासाठी स्थानबद्ध केलेल्या अमृतपाल यानेही उघडपणे बंदुकांचे प्रदर्शन करणार्या समर्थकांसमवेत सुवर्ण मंदिराचा दौरा केला आणि सहस्रोंच्या जमावाला संबोधित केले. खलिस्तानी प्रचार व्यवस्थेने ही छायाचित्रे काही घंट्यांमध्येच धार्मिक गाण्यांसमवेत ‘व्हॉट्सॲप स्टेटस’ आणि ‘इंस्टाग्राम रील्स’या सामाजिक माध्यमांमधून शीख तरुणांमध्ये प्रसारित केली. अमृतपाल याला पंजाबमध्ये आता ‘भिंद्रनवाले २.०’ (दुसरा भिंद्रनवाले) संबोधण्यात येऊ लागले आहे. तो केवळ भिंद्रनवालेसारखी वेशभूषाच करत नाही, तर त्याच्याप्रमाणे प्रक्षोभक वक्तव्यही करत असतो. तो भिंद्रनवालेसारखा हत्यारबंद समर्थकांमध्ये फिरतो. अमृतपाल याला भिंद्रनवालेच्या स्वरूपात पुढे आणण्याचा प्रयत्न करणार्या लोकांचा त्याच्याविषयीच्या मानसशास्त्राचा अभ्यास आहे. त्यांनी अनेक वर्षे भिंद्रनवालेविषयी कपोलकल्पित कथा पसरवल्या, तसेच त्याला ‘संत’ आणि ‘महानायक’ म्हणून प्रस्थापित केले.
त्याचा परिणाम असा की, मागील काही वर्षांमध्ये खलिस्तान समर्थक युवकांचा एक समुदाय बनला आहे, ज्यांना त्यांच्या हयातीत भिंद्रनवालेसारखी भूमिका परत एकदा पहायची आहे. अमृतपालला ‘भिंद्रनवाले २.०’ बनवून त्यांची इच्छा पूर्ण करण्यात येत आहे. मागील ५-६ वर्षांत पंजाबमध्ये अतिशय लोकप्रिय असणार्या पंजाबी पॉप गाण्यांमध्ये भिंद्रनवाले, बंदुका, बंकर्स आणि देहलीला आव्हान देणे यांचे मोठ्या प्रमाणावर उदात्तीकरण करण्यात येत आहे. त्यावरून हे मानसशास्त्र चांगल्या प्रकारे ओळखता येते. या वातावरणासाठी खलिस्तान समर्थकांएवढेच ‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती’चे राजकारण उत्तरदायी आहे.
३. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे पंजाबसाठी धोकादायक राजकारण
‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती’शी संबंधित नेत्यांनी ‘ऑपरेशन ब्लू स्टार’चा वार्षिक कार्यक्रम साजरा करणे समजू शकतो; कारण या अभियानात शिखांच्या सर्वांत पवित्र तीर्थस्थानाला हानी पोचवण्यात आली होती. केवळ शीखच नाही, तर कोट्यवधी हिंदु भाविकांच्याही भावना या सुवर्ण मंदिराशी जोडलेल्या आहेत. ‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती’ समजावून देऊ शकते का की, त्यांनी गुरुद्वारामध्ये भिंद्रनवालेसारख्या वादग्रस्त व्यक्तीची प्रतिमा का लावू दिली ? जो त्याच्या भाषणांमध्ये प्रत्येक अनुयायाला ३५ हिंदूंची हत्या करण्याचे आवाहन करत होता. पोलीस अधिकारी आणि सामान्य लोक यांच्या हत्या करण्यासाठी भिंद्रनवालेच्या सभांमधील व्यासपिठावरून उघडपणे नावे घेतली जात होती. हाही विचार करायला लावणारा प्रश्न आहे की, जर भिंद्रनवालेने श्री अकाल तख्त साहिबमध्ये डेरा (गर्दी) जमवून कारवायांचे संचालन केले नसते, तर ब्लू स्टार अभियानासारखी घटना कधी घडली असती का ? हेही खरे आहे की, जर अकाली नेत्यांनी देहलीतील सरकारच्या आवाहनावरून समजूतदारपणा दाखवत अकाली मोर्चा स्थगित केला असता, तर कदाचित् ‘ब्लु स्टार’ अभियानाचा निर्णय परत घेतला असता.
आजचे ‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती’चे नेते हे विसरले की, ‘ब्लू स्टार’च्या काळात श्री अरिमंदिर साहिबमध्ये फसलेले गुरुचरण सिंह टोहरा आणि हरचरण सिंह लोंगोवाल या अकाली नेत्यांवर भिंद्रनवालेच्या समर्थकांनी कशा प्रकारे ग्रेनेडने आक्रमण करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी भारतीय सैन्यानेच त्यांना चिलखती वाहनात सुवर्ण मंदिरातून काढले होते. एवढे होऊनही ‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती’ त्याच राजकारणाची पुनरावृत्ती करत आहे, जी आनंदपूर साहिब प्रस्तावाने पंजाबाला १९८४ च्या परिस्थितीत घेऊन गेली होती. त्यात अकाली आणि भिंद्रनवाले यांच्यात कोण अधिक कट्टरतावादी आहे ? यात स्पर्धा होती. कट्टरतावाद्यांच्या स्पर्धेत बहुतेक वेळा अधिक कट्टरतावाद्यांचा विजय होतो. तेव्हा भिंद्रनवाले होता आणि आता अमृतपाल दिसून येत आहे. खलिस्तानसमर्थक, कट्टरपंथ, मतांतरण, नशेखोरी आणि चुकीच्या पद्धतीने केल्या जाणार्या रासायनिक शेतीचे दुष्परिणाम पहाता कर्करोगासारख्या महामारीशी लढणार्या पंजाबच्या संदर्भात धोक्याची घंटा वाजवण्याची वेळ आली आहे. ग्यानी झैल सिंह यांच्या शब्दांचे स्मरण केले, तर पंजाबच्या पुस्तकाची पाने परत एकदा विखुरली जात आहेत.’
लेखक – अधिवक्ता दिव्य कुमार सोती, राष्ट्रीय सुरक्षाविषयक धोरणांचे विश्लेषक
(साभार : दैनिक ‘जागरण’ आणि ‘ट्विटर’ खाते)