आध्यात्मिक स्तरावरील त्रास न्यून झाल्याबद्दल साधिकेचे झालेले चिंतन आणि तिने व्यक्त केलेली कृतज्ञता  !

मला अनेक जण विचारतात, ‘तुला तीव्र आध्यात्मिक त्रास असतांना तो अल्प होण्यासाठी तू काय प्रयत्न केलेस ?’  माझा त्रास अल्प होणे, ही गुरुकृपेची मोठी अनुभूतीच आहे. ‘माझा त्रास अल्प होण्यामध्ये मला कुणाकुणाचे आणि कसे साहाय्य मिळाले ?’ याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

सौ. सोनाली पोत्रेकर

१. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांची अनुभवलेली प्रीतीमय कृपा !

सद्गुरु अनुताई (सद्गुरु अनुराधा वाडेकर) यांच्या कृपेविषयी वर्णन करण्यासाठी शब्दही अपुरे पडतील. त्यांनी मला त्रास आणि अडचणी येत असतांना पुष्कळ साहाय्य केले. त्यांच्या या प्रीतीमय कृपेसाठी मी त्यांची कृतज्ञ आहे.

२. रामनाथी आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सद्गुरु आणि संत यांचे दर्शन अन् बोलणे यांमुळे पुष्कळ चैतन्य मिळते.

३. पू. जलतारेआजींची सेवा करतांना त्रास अल्प होणे

३ अ. त्रास अल्प व्हावा, ही पू. जलतारेआजींची इच्छा असणे : पू. जलतारेआजी (सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारे) प्रतिदिन साधकांसाठी नामजपादी उपाय करतात. पू. आजींनी उपाय संपल्यावर त्यांचा हात धरून त्यांना त्यांच्या खोलीत नेण्याची सेवा मला दिली होती. ही सेवा देण्यामागे ‘माझा आध्यात्मिक त्रास लवकर अल्प व्हावा’, हा त्यांचा हेतू होता. केवळ पू. आजींच्या इच्छेमुळेच माझे त्रास अल्प झाले.

३ आ. पू. जलतारेआजींच्या हाताच्या चैतन्यदायी स्पर्शामुळे त्रास न्यून होणे : प्रत्येक वेळी मी त्यांचा हात धरल्यावर ‘त्यांच्या हातातून माझ्या हातात चैतन्य जात आहे’, अशी अनुभूती मला यायची. त्या वेळी माझे भान हरपून ‘परम पूज्य’, असा माझा जप आपोआप व्हायचा. त्या वेळी ‘मी लहान असून पू. आजीच माझा हात धरून मला चालवत आहेत’, असे मी अनुभवायचे.

४. भोजनकक्षात सेवा करतांना पू. रेखाताई (पू. रेखा काणकोणकर, सनातनच्या ६० व्या संत) प्राधान्याने नामजपादी उपाय करण्यास सांगून मला प्रोत्साहन देत असत.

५. आश्रम आणि आश्रमातील साधक यांचे योगदान

५ अ. भूवैकुंठ असलेल्या सनातनच्या आश्रमातील चैतन्य आणि शक्ती यांनी साधकांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होणे : सनातनचा रामनाथी आश्रम म्हणजे भूवैकुंठच आहे. येथील प्रत्येक कणात सामावलेले चैतन्य आणि शक्ती यांमुळे साधकांना सतत आध्यात्मिक स्तरावर लाभ होत असतात. आश्रमात आध्यात्मिक स्तरावरील उपायांसाठी येणार्‍या साधकांना आश्रमातील चैतन्यामुळे बुद्धीअगम्य असा लाभ होत असतो. जे मला अनेक वर्षांत शक्य झाले नाही, ते या आश्रमातील वास्तव्यामुळे शक्य झाले आहे. या ‘आश्रमापासून एक क्षणही दूर जाऊ नये’, असे मला वाटते. अशा या आश्रमाप्रती कोटीश: कृतज्ञता !

५ आ. आश्रमातील साधक

१. ‘माझा आध्यात्मिक त्रास अल्प झाला आहे’, हे कळल्यानंतर माझ्यापेक्षा आश्रमातील साधकांनाच अधिक आनंद झाल्याचे माझ्या लक्षात आले. माझा आध्यात्मिक त्रास अल्प होण्यामागे त्या सर्वांची इच्छा होती. त्यांनीही मला वेळोवेळी साहाय्य केले.

२. मी आश्रमात नवीन असतांना भोसलेकाकांनी (आधुनिक वैद्य भिकाजी भोसले यांनी) मायेने मला ध्यानमंदिरातील आरतीमुळे होणार्‍या उपायांचे महत्त्व सांगून प्रतिदिन आरतीला यायला सांगितले. मी आरतीला उपस्थित राहिल्यामुळे मला होणारा आध्यात्मिक त्रास उणावण्यास साहाय्य झाले.

३. आरंभी माझे आध्यात्मिक स्तरांवरील उपाय पूर्ण होत नसत. सौ. स्वाती शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांनी माझ्या सेवेचे नियोजन करून दिल्यामुळे माझे नामजपादी उपाय पूर्ण होऊ लागले. त्यामुळेही माझे आध्यात्मिक त्रास अल्प झाले.

६. आश्रमात होणारे आढावासत्संग आणि भावसत्संग यांमुळे भावजागृतीचे प्रयत्न होणे

प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे मला व्यष्टी साधनेचा आढावा आणि भावसत्संग यांना उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. आढाव्यामुळे माझ्या मनाचा अभ्यास होऊ लागला. एका आढाव्यात आढावासेविका सौ. सुप्रिया माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांनी मला सत्रसंख्या पूर्ण करण्यासाठी सांगितल्यामुळे माझी स्वयंसूचनांची सत्रसंख्या पूर्ण होऊ लागली. कु. वैष्णवी वेसणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) या घेत असलेल्या भावसत्संगामुळे या शुष्क जिवावर भावाचा शिडकावा होऊन भावाच्या स्तरावर लाभ झाला.

७. कुटुंबीय

७ अ. यजमानांनी साधिकेला आश्रमात वास्तव्यास आणणे आणि साधनेत साहाय्य करणे : प.पू. डॉक्टर, माझा त्रास अल्प झाला, यासाठी मी माझे यजमान श्री. रवींद्र पोत्रेकर यांच्याप्रतीही कृतज्ञ आहे. त्यांनी स्वतःच्या त्रासांशी लढून आणि असंख्य तडजोडी करून आम्हाला आश्रमात आणले. ते तत्त्वनिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांचे मला साधनेत पुष्कळ साहाय्य होते. मला असे यजमान मिळाले, यासाठी मी तुमच्या चरणी कृतज्ञ आहे.

७ आ. मुलांनी समजून घेणे : तुमच्या कृपेने माझी मुलेही गुणी आहेत. आम्हा दोघांनाही (मी आणि माझे यजमान यांना) तीव्र त्रास असल्यामुळे मुलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. ते दोघेही मला पुष्कळ समजून घेतात. त्यांच्या प्रतीही मी कृतज्ञ आहे.

८. अन्य काही सूत्रे

अ. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रावरील निर्माल्यातील फूल डोक्यात घातल्याने मला अनिष्ट शक्तींमुळे आलेले आवरण दूर होत होते.

आ. एकदा मला अनिष्ट शक्तींचे पुष्कळ आवरण आले होते. तेव्हा फलकावर चुका लिहिल्यावर माझ्या तोंडवळ्यावरील आवरण दूर झाल्याचे मुलाने (कु. सोहम्, वय १० वर्षे याने) सांगितले.

परात्पर गुरु डॉक्टर, माझा त्रास अल्प होण्यामध्ये माझे योगदान शून्य आहे. ही सगळी तुमचीच कृपा मी अनुभवत आहे. यासाठी कृतज्ञता, कृतज्ञता आणि केवळ कृतज्ञता !

– सौ. सोनाली रवींद्र पोत्रेकर (वय ३९ वर्षे), फोंडा, गोवा. (३१.७.२०२२)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक