पंढरपूर येथे एकादशीनिमित्त सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केला ‘निर्धार फाऊंडेशन’चा सन्मान !

राकेश दड्डणावर (उजवीकडे) यांचे  अभिनंदन करतांना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

पंढरपूर – कार्तिकी वारीच्या निमित्ताने निर्धार फाऊंडेशनच्या माध्यमातून ‘सांगलीची स्वच्छतावारी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दारी’ ही विशेष मोहीम राबवण्यात आली होती. या अभियानाची नोंद घेत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे बोलावून घेत निर्धार फौंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डणावर आणि त्यांचे सहकारी यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. या वेळी निर्धार फाऊंडेशनचे सदस्य कृष्णा मडीवाळ, अनिल अंकलखोपे, वसंत भोसले, अनिरुद्ध कुंभार, मनोज नाटेकर, रोहित कोळी उपस्थित होते.

या प्रसंगी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, ‘‘महाराष्ट्र आणि इतर राज्यातून वारीच्या माध्यमातून लाखो भाविक पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. अशात पहिल्यांदा निःस्वार्थपणे सेवेच्या उद्देशाने सांगली जिल्ह्यातून निर्धार फौंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डणावर आणि त्यांचे सहकारी यांनी स्वच्छतादूतांच्या माध्यमातून चंद्रभागाच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. यात मोठ्या प्रमाणावर कचरा संकलन करून स्वच्छतेचा संदेश कृतीतून देण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट अत्यंत कौतुकास्पद आहे. ही मोहीम महाराष्ट्राला आदर्शवत् ठरणारी आहे.’’