‘माऊली’ या अध्यात्मातील उच्च पदाकडे वाटचाल करणार्‍या सनातनच्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार (वय ३३ वर्षे) !

उद्या, २०.११.२०२२ (कार्तिक कृष्ण एकादशी) या दिवशी सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने सनातन आश्रम, देवद येथील पू. शिवाजी वटकर यांना पू. (सौ.) अश्विनी पवार यांची जाणवलेली गुणवैशिष्ठ पुढे दिली आहेत.

पू. (सौ.) अश्विनी पवार

पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांना ३३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

पू. शिवाजी वटकर

१. सनातन संस्थेच्या गुरुकुलातील साधिकांनी पू. अश्विनीताईंना ‘आई’ म्हणणे आणि याचे परात्पर गुरु डॉक्टर अन् अन्य साधक यांना आश्चर्य वाटणे

‘वर्ष २०१० मध्ये रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात संस्थेच्या गुरुकुलामध्ये लहान वयाचे साधक आणि साधिका शिकत होत्या. त्या गुरुकुलात कु. अश्विनी साळुंखे (आताच्या पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार, त्या वेळचे वय २१ वर्षे) याही होत्या. त्या त्यांच्या समवेत असणार्‍या सर्व साधिकांची एवढी चांगली काळजी घ्यायच्या की, सहसाधिका त्यांना ‘आई’ असे म्हणायच्या. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आणि सर्व साधकांनाही याचे आश्चर्य वाटत असे; कारण सहसाधिकांच्या आणि पू. अश्विनीताई यांच्या वयात केवळ ३ – ४ वर्षांचेच अंतर होते.

२. आश्रमातील साधकांवर पू. अश्विनीताई मातेसम प्रेम करत असल्याने साधकांना त्या आईप्रमाणे वाटणे आणि त्यांनी पू. अश्विनीताईंना ‘माऊली’ असे संबोधणे

सध्या पू. अश्विनीताई देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला असतात. तेथील साधकांची साधना आणि सेवा चांगली व्हावी, यांसाठी त्या साहाय्य करतात. त्या शिस्त लावणारी, संस्कार अन् पालनपोषण करणारी आई होतात आणि ‘माऊली’ होऊन सर्व साधकांवर मायाही (प्रेमही) करतात. त्यामुळे माहेरी आल्यावर एखादी मुलगी जशी आनंदात रहाते, तसे साधकांना आश्रमात वाटते आणि त्यांना पू. ताईंचा आईप्रमाणे आधार वाटतो.

त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असलेले काही साधकही त्यांना ‘पू. अश्विनीआई’ म्हणून संबोधतात. काही साधक त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कविता करतात. त्यामध्ये पूर्वी ‘पू. ताई’ लिहिणारे साधक आता ‘माऊली’ असे लिहितात. वर्ष २०२१ च्या वाढदिवसाच्या दिवशी बर्‍याच कवितांमध्ये पू. अश्विनीताईंना ‘माऊली’ असे संबोधले होते.

३. संत ज्ञानेश्वरांना स्थानिक लोक आणि विद्वान यांनी पुष्कळ त्रास देऊनही त्यांच्या साहित्यामध्ये द्वेषभावनेला स्थान नसूनत्यांनी जनकल्याणासाठी साहित्यनिर्मिती करणे

संत ज्ञानेश्वर लहान असतांना त्यांच्या भावंडांसह आळंदी येथे इंद्रायणी नदीत अंघोळीला गेले होते. तेव्हा तेथील विद्वानांनी त्यांना नदीत पायही ठेवू दिला नाही. तेथील विद्वान आणि स्थानिक लोक यांनी ‘धर्म बुडवणार्‍या संन्याशाची मुले’, असे म्हणून त्यांचा अतोनात छळ केला. ज्ञानेश्वरांनी पुष्कळ दुःख आणि यातना सहन केल्या; मात्र त्यांच्या साहित्यामध्ये कुठेही कुणाविषयी राग किंवा द्वेष नाही. त्यांनी श्रोत्यांसह सुखसंवाद साधणारी ज्ञानेश्वरी, शिष्याला मार्ग दाखवणारी चांगदेवपासष्टी, अमृतानुभवाचा आत्मसंवाद, तर लोकसंवाद साधणारी अभंग-रचना निर्माण केली.

४. संत ज्ञानेश्वर यांना सर्वांनी ‘माऊली’ म्हणणे, ‘माऊली’ हे अध्यात्मातील एक उच्च पद असून पू. अश्विनीताईंची या पदाकडे वाटचाल होत आहे’, असे जाणवणे

सर्वसामान्य माणसांसाठी संत ज्ञानेश्वर म्हणजे ‘माऊली’ ! केवढा हा त्यांचा आध्यात्मिक अधिकार ! वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. त्यांनी समाधी घेऊन ७२५ वर्षे झाली, तरी २१ वर्षांच्या तरुण ज्ञानेश्वरांना अजूनही ‘माऊली’ असे म्हटले जाते. यावरून ‘मातृत्व (आई होणे)’ हे केवळ स्त्रीत्वाशी किंवा प्रसूती वेदनांशी निगडित नाही, तर ‘माऊली’ हे अध्यात्मातील एक उच्च पद आहे. अशा पदाकडे ‘पू. (सौ.) अश्विनी पवार (वय ३२ वर्षे) यांची वाटचाल होत आहे’, असे मला जाणवते.

आमची गुरुमाऊली परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी देवद आश्रमातील साधकांच्या पालनपोषणासाठी आणि साधनेला साहाय्य होण्यासाठी पू. अश्विनी पवार यांच्या रूपात एक ‘आध्यात्मिक माऊली’ दिली आहे. त्यासाठी परात्पर गुरु डॉक्टर आणि पू. अश्विनीमाऊली यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करून प्रार्थना करतो,

पू. अश्विनीताई असती आमुची गुरुमाऊली ।

दुःखहारिणी अन् आनंददायिनी आहे ही माऊली ।। १ ।।

आमच्या शिरी राहो सदा ।

या माऊलीच्या कृपेची सावली ।। २ ।।’

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.१२.२०२१)