मुंबईतील रुद्रवीणावादक श्री. सौरभ नगरे यांच्या रुद्रवीणा वादनाच्या वेळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे साधक यांना आलेल्या अनुभूती

ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग

१० आणि ११.११.२०२२ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने मुंबई येथील रुद्रवीणावादक श्री. सौरभ नगरे यांच्या रुद्रवीणा वादनाचे संशोधनपर प्रयोग करण्यात आले. ‘रुद्रवीणा’ हे एक तंतूवाद्य आहे. ‘रुद्र’ हे भगवान शिवाचे एक नाव असून हे वाद्य भगवान शिवाशी संबंधित आहे.

श्री. सौरभ नगरे

श्री. सौरभ नगरे हे अभियंता (इंजिनीयर) असून गेली ६ वर्षे ते मुंबईतील पं. सुवीर मिश्रा यांच्याकडून रुद्रवीणेचे शिक्षण घेत आहेत. या प्रयोगाच्या वेळी रुद्रवीणेवर त्यांनी काही रागांचे वादन केले. या वादनाच्या वेळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ उपस्थित होते. त्यांना आणि तेथे असलेले महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे साधक, तसेच सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

संकलक : सौ. अनघा जोशी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), बी.ए. संगीत, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

सौ. अनघा जोशी

१. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ 

‘रुद्रवीणेवर राग ‘बागेश्री’ ऐकतांना मला शांतीची स्पंदने जाणवली. माझे मन शांत झाले. प्रारंभी चैतन्याची स्पंदने अधिक प्रमाणात होती. त्यानंतर ‘वातावरणात आनंदाची स्पंदने वाढली’, असे मला जाणवले.’

२. आधुनिक पशुवैद्य अजय जोशी (आध्यात्मिक स्तर ६८ टक्के)

‘ही वीणा (रुद्रवीणा) शिव आणि सरस्वतीदेवी यांच्याशी संबंधित आहे’, असे मला वाटले. ‘हे वादन आकाशतत्त्व आणि वायूतत्त्व प्रधान आहे’, असे मला जाणवले.’

३. श्री. राम होनप, सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ता साधक 

‘केवळ रुद्रवीणा पाहूनच माझी भावजागृती झाली. वादन ऐकतांना मला माझ्या अनाहत आणि विशुद्ध या चक्रांवर स्पंदने जाणवली.’

४. श्री. निषाद देशमुख, सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ता साधक (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के)

‘प्रारंभी मला ध्यानस्थ असलेल्या भगवान शिवाचे दर्शन झाले आणि शिवपूजा होतांना दिसली. त्या वेळी ‘वातावरणात आकाशतत्त्व अधिक प्रमाणात प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.’

५. कु. म्रिणालिनी देवघरे, भरतनाट्यम् विशारद 

‘वादन ऐकतांना माझे ध्यान लागले. माझ्या सहस्रारचक्रावर मला संवेदना जाणवली. मला  भोवतालचे भान न रहाता ‘मी देवलोकात गेले आहे’, असे वाटले.’

(११.११.२०२२)

मुंबई येथील श्री. सौरभ नगरे (वय २८ वर्षे) यांच्या रुद्रवीणेच्या वादनाचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘१०.१०.२०२२ या दिवशी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने मुंबई येथील श्री. सौरभ नगरे (वय २८ वर्षे) यांच्या रुद्रवीणेच्या वादनाचा प्रयोग आध्यात्मिक त्रास असलेले आणि नसलेले साधक यांच्यावर करण्यात आला. या वेळी श्री. नगरे यांनी राग ‘बागेश्री’ सादर केला. तेव्हा देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.

श्री. राम होनप

१. ‘रुद्रवीणेची सात्त्विकता आणि श्री. नगरे यांचा रुद्रवीणेविषयीचा भाव’, यांचा एकत्रित परिणाम म्हणून रुद्रवीणा पहाताच माझा भाव जागृत झाला.

२. श्री. नगरे यांनी रुद्रवीणेच्या वादनास प्रारंभ करताच त्यातून येणार्‍या दैवी नादांमुळे प्रथम रुद्रवीणेच्या २ तुंब्यांत (टीप १) पांढर्‍या रंगाच्या दैवी लहरी निर्माण झाल्या.

टीप १ – रुद्रवीणेला २ भोपळे असतात. त्यांना ‘तुंबे’, असे म्हणतात.

त्यानंतर श्री. नगरे यांच्या शरिराभोवती पांढर्‍या रंगाच्या दैवी लहरी निर्माण झाल्या. नंतर या दैवी लहरींचे प्रक्षेपण श्रोत्यांच्या दिशेने होऊ लागले. (प्रत्यक्षातही कार्यक्रमानंतर श्री. नगरे यांनी ‘रुद्रवीणेच्या वादनाच्या वेळी तुब्यांत दैवी लहरी निर्माण होतात’, असे अनुभवल्याचे सांगितले.)

३. रुद्रवीणेच्या नादाने प्रथम माझे मन आणि त्यानंतर बुद्धी यांना शांतता जाणवू लागली.

४. रुद्रवीणेच्या नादातून निर्माण होणारी दैवी ऊर्जा माझे अनाहतचक्र आणि विशुद्धचक्र यांना प्राप्त होत होती. तिला ‘नादऊर्जा’ किंवा ‘नादातील शक्ती’, असे म्हणतात.

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.१०.२०२२)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक