कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे ओला दुष्काळ घोषित करावा, हानीग्रस्त शेतकर्यांना हेक्टरी ५० सहस्र रुपये द्यावे यांसह शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने (ठाकरे गट) कोल्हापूर-सांगली रस्त्यावर शिरोली येथे ७ नोव्हेंबरला रस्ता बंद आंदोलन करण्यात आले. संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी सुमारे १ घंटा रस्ता बंद आंदोलन केले.
या प्रसंगी अरुण दूधवडकर म्हणाले, ‘‘सरकारकडून पंचनामे करण्यास विलंब झाला आहे. आता आमचे शिवसैनिक शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करतील. त्यानंतरही सरकारने शेतकर्यांना साहाय्य दिले नाही, तर तीव्र आंदोलन केले जाईल. त्या वेळी होणार्या परिणामाला सरकारच उत्तरदायी असेल.’’ या प्रसंगी माजी आमदार उल्हास पाटील, सुजित मिणचेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.