सातारा शहरातील ‘रिफ्लेक्टर’ आरशांची अवस्था बिकट !

माची पेठेतील मुख्य रस्त्यावर खांबावरून खाली आलेला ‘रिफ्लेक्टर’ आरसा 

सातारा, २५ ऑक्टोबर (वार्ता.) – सहस्रो रुपये व्यय करून सातारा नगरपालिकेच्या वतीने अपघातांचे प्रमाण अधिक असणार्‍या चौकामध्ये ‘रिफ्लेक्टर’ आरसे (वळणावर अथवा चौकात समोरच्या बाजूने येणारे वाहन कळावे, यासाठी बसवलेले आरसे) बसवले आहेत. या आरशांची अवस्था आता मात्र बिकट झाली आहे.

सातारा शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे जुने वाडे, जुन्या इमारती अस्तित्वात असून वाढत्या लोकसंख्येमुळे रस्ते अरुंद वाटू लागले आहेत. शहरातील छोट्या रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण अधिक आहे. यावर उपाययोजना म्हणून सातारा नगरपालिकेच्या वतीने सहस्रो रुपये व्यय करून ‘रिफ्लेक्टर’ आरसे बसवण्यात आले. शहरातील मोती तळे, माची पेठ आदी महत्त्वाच्या रस्त्यांवर हे आरसे बसवण्यात आले आहेत; मात्र याच्या देखभालीकडे सातारा नगरपालिकेकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते. काही आरशांची दिशा पालटलेली आहे, तर काही आरसे भूमीला टेकले आहेत. काही आरशांवर धुळ बसून त्यात काहीही दिसत नाही, तर काही आरशांपुढे जाहिरातींचे फलक लावण्यात आले आहेत. सातारा नगरपालिका ‘रिफ्लेक्टर’ आरशांच्या या दु:स्थितीकडे कधी लक्ष देणार ? असा प्रश्न सूज्ञ सातारावासीय उपस्थित करत आहेत.