छत्तीसगडच्या रायगड महापालिकेची थेट श्री हनुमानाला पाणीपट्टी भरण्यासाठी नोटीस !

रायगड (छत्तीसगड) – येथे महापालिकेने श्री हनुमानाला पाणीपट्टी न भरल्याने  नोटीस पाठवली आहे. ‘जर १५ दिवसांत रक्कम चुकवण्यात आली नाही, तर कारवाई होईल’ अशी चेतावणीही यात देण्यात आली आहे. ही नोटीस येथील बजरंगबली मंदिराला जारी करण्यात आली आहे; मात्र त्यावर नोटीस मिळणार्‍या व्यक्तीच्या नावाच्या जागी ‘हनुमानजी’ असा उल्लेख आहे. विशेष म्हणजे या मंदिरात पाण्याचा एकही नळ नाही. मंदिराच्या जवळच्या परिसरात कोणताही नळ नाही. असे असतांनाही ही नोटीस बजावण्यात आली आहे.

यावर संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी खुलासाही केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ‘अमृत मिशन’ या नळजोडणी योजनेचे काम कामगारांनी केले होते. त्याची नोंद संगणकामध्ये केली गेली होती. त्यामुळे ही नोटीस जारी झाली. (संगणकीय नोंदीही कशा प्रकारे केल्या जातात, याचा हा नमुना ! – संपादक) 

संपादकीय भूमिका

यावरून प्रशासनाचा कारभार कसा चालतो, हेच येथे लक्षात येते !