प्रशासनाची निष्क्रीयता नागरिकांच्या गैरसोयीला आणि संतापाला कारणीभूत ठरते !
देहू (जिल्हा पुणे) – तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात देहूसाठी ३१ कोटी रुपयांचा सांडपाणी आणि मलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला; मात्र हा प्रकल्प गेले अनेक मास बंद आहे. त्यामुळे ३ गावांतील सांडपाणी सरळ इंद्रायणीच्या पाण्यात मिसळत आहे. परिणामी पाणी दूषित होऊन नदीतील मासे दोन वेळा मृत झाले, तर येथे येणार्या भाविकांना अशुद्ध नदीतील पाणी मिळत आहे. त्यातच हा प्रकल्प पूर्ण नसल्याचे कारण देत देहू नगर पंचायतने कह्यात घेतला नाही. १७५ कोटी रुपये व्यय करून देहूत विकास आराखड्यात कामे झाली आहेत. हा विकास आराखडा विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली राबवला गेला; मात्र आराखडा राबवत असतांना त्या-त्या खात्याकडून लक्ष दिले जात नाही, अशी तक्रार नागरिक करत आहेत. (नागरिकांना तक्रारी का कराव्या लागतात ? प्रशासनाच्या ते लक्षात येत नाही का ? – संपादक)
देहू नगर पंचायतीचे गटनेते योगेश परंडवाल म्हणाले की, गावातील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पापर्यंत जात नाही. याकरता ३ वेळा बैठका होऊनही ठेकेदार काम चालू करत नाही. गेल्या सप्ताहामध्ये जिल्हाधिकार्यांसमवेत बैठक झाली; परंतु निर्णय होत नसल्याने हा प्रकल्प सद्यस्थितीत बंदच आहे.