मेट्रो मार्गिकेचे काम करतांना खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्याचे दायित्व मेट्रोचे !

पुणे – मेट्रो मार्गिका आणि स्थानक यांचे काम करतांना खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे दायित्व महामेट्रोचे आहे. त्यामुळे मेट्रो स्थानक आणि मेट्रो मार्गिका यांचे काम चालू असलेल्या ठिकाणचे रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, असे आदेश महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रमकुमार यांनी महामेट्रोला दिले; मात्र मेट्रोकडून रस्ते दुरुस्तीची कामे केली जात नसल्याची तक्रार महापालिकेच्या अधिकार्‍यांनी केली. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रमकुमार यांनी महापालिकेच्या प्रथम विभागाचे अधिकारी आणि महामेट्रोचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन मेट्रोच्या कामामुळे खराब झालेल्या रस्त्यांचे दायित्व महामेट्रोचे आहे, हे स्पष्ट केले. मेट्रो स्थानकाच्या खालील बाजूचा १४० मीटर आणि स्थानकाच्या दोन्ही बाजूला २०० मीटरपर्यंत, असे एकूण ५४० मीटरच्या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती मेट्रोने करावी, असे ठरले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रस्तावित मेट्रो मार्गिकेच्या कामांमुळे शिवाजीनगर ते बाणेर या दरम्यानच्या रस्त्यांची दुरुस्ती पी.एम्.आर्.डी.ए.ने करावी, अशी सूचनाही त्यांनी या वेळी केली.