संत एकनाथ महाराजांनी सांगितलेली निजात्मपूजा (आत्मपूजा) आणि त्यादृष्टीने असणारे विजयादशमीचे माहात्म्य !

‘नवरात्रीच्या सणात प्रथम ९ दिवस महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांची पूजा करण्यात येते. त्या वेळी आपल्यातील तमोगुणाचे प्राबल्य, म्हणजे विकार नाहीसे होण्यासाठी महाकालीची पूजा केली जाते. रजोगुण, म्हणजेच शक्ती वाढवण्यासाठी महालक्ष्मीची अन् सत्त्वगुण वाढवण्यासाठी महासरस्वतीची पूजा करतात. ज्ञानाद्वारे सत्य-असत्य जाणून सत्याशी संलग्न होण्यासाठी या देवींची पूजा करायची असते. अशा प्रकारे आत्मबलपूर्वक समर्थ होऊन विजयादशमी, म्हणजे दसरा साजरा केला जातो आणि मायेची सीमा पार करून (गुणातीत होऊन) समष्टीसाठी सर्वत्र चैतन्यरूप वातावरण निर्माण करण्यासाठी विजय प्राप्त करण्यासाठी) सीमोल्लंघन केले जाते. साधकाची ती समष्टी साधनाच होते. वेदांमध्येसुद्धा ‘कृण्वन्तो विश्वमार्यम् ।’ (ऋग्वेद, मण्डल ९, सूक्त ६३, ऋचा ५) म्हणजे ‘संपूर्ण जगाला आर्य (सुसंस्कृत) करू’, असे म्हटले आहे.

१. दहाव्या क्रमांकावर असलेल्या ‘निजात्मपूजे’चे एकनाथी भागवतातील वर्णन

‘१०’ या अंकासंबंधी एकनाथी भागवतात एकनाथ महाराज यांनी ‘१०’ व्या ‘निजात्म पूजे’चे वर्णन केले आहे, ते साधनेच्या दृष्टीने साधकासाठी पुष्कळ महत्त्वाचे आहे. ही आत्मपूजा साध्य झाली की, तीच खरी विजयादशमी होते.

२. खर्‍या आत्मपूजेचे महत्त्व जाणून घेणे, हे विजयादशमीचे खर्‍या अर्थाने माहात्म्य !

एकनाथ महाराज यांनी केवळ ‘१०’ या अंकावरून मूलस्वरूप असे आत्मज्ञानच देऊन साधकाला खर्‍या आत्मपूजेचे माहात्म्य सांगितले आहे. अशा प्रकारे साधकाने वागल्यास त्याला ईश्वरप्राप्ती होण्यास सहज सुलभ होईल. हेच विजयादशमीचे (दश इंद्रियांवर म्हणजेच स्वभावदोष आणि अहं यांवर विजय प्राप्त करणार्‍या दशमीचे) खर्‍या अर्थाने माहात्म्य आहे.

३. दशहरा म्हणजे साधनेद्वारे इंद्रियनिग्रह करून स्वतःवर विजय मिळवणे होय !

दशहरासुद्धा तेच दाखवतो. ‘१०’ अंकाला (दश इंद्रियांना) खर्‍या अर्थाने समजून घेऊन त्याचे हरण करणे, म्हणजे ‘दशहरा’ होय; एकूण साधनेद्वारे इंद्रियनिग्रह झाल्यावर, म्हणजेच स्वतःवर विजय मिळवल्यावर तो खर्‍या अर्थाने कोणत्याही परिस्थितीशी सामना करून विजय मिळवू शकतो. आपण जिंकलो की, सर्व जग जिंकले जाते; म्हणून केवळ इंद्रियनिग्रहासाठी संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग ।’ याप्रमाणे ‘सतत साधना करत राहिल्यास इंद्रियनिग्रह सहज शक्य होतो’, असे त्यांना म्हणायचे आहे. स्वतः व्यष्टी साधनेद्वारे परिपूर्ण झाल्याविना समष्टी साधनेला बळकटी येत नाही.

– परात्पर गुरु परशराम पांडे

हे श्रीकृष्णा, आमच्यातील आत्मस्वरूपाची ओळख होऊन त्या स्वरूपसंधानातून येथे वर्णन केल्याप्रमाणे आमची साधना होऊ दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना !