अन्न आणि औषध प्रशासन अन् पोलीस यांची संयुक्त कारवाई !
मुंबई – सीलबंद दूधाच्या साठ्यात पाण्याची भेसळ करणारे धारावी येथील मोठे जाळे पोलीस, तसेच अन्न आणि औषध प्रशासन (एफ्.डी.ए.) यांच्या अधिकार्यांनी उघडकीस आणले आहे. १५ सप्टेंबर या दिवशी पहाटे अधिकार्यांनी धारावी येथील ए.के. गोपालनगर आणि इंदिरानगर येथे धाडी घालून तब्बल ८०७ लिटरचा ४५ सहस्र ८५२ रुपयांचा भेसळयुक्त दुधाचा साठा नष्ट केला. या कारवाईत धारावी येथील शाहूनगर पोलीस ठाण्यात ‘एफ्.डी.ए.’ने ६ आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
सेदूल खेरिंग, कोमरवेल्ली बोबली, वेंकटा याल्गाबोएना, नससिंह राज्य, जहांगिली अनंताह आणि नागेश रांगमलिया, अशी गुन्हे नोंद केलेल्यांची नावे आहेत. मध्यरात्रीच्या वेळी धारावी येथे अमोल, गोकुळ आणि गुडमॉर्निंग अशा प्रसिद्ध दूध आस्थापनांतील दुधाच्या पिशव्या फोडल्या जायच्या आणि त्यात पाणीमिश्रित दूध भरले जायचे. हा प्रकार ‘एफ्.डी.ए.’च्या अधिकार्यांनी पोलिसांच्या साहाय्याने रंगेहात पकडला. सकाळी ८ वाजेपर्यंत ही कारवाई चालू होती.
भेसळयुक्त दुधाच्या पिशव्या ओळखायच्या कशा ?ग्राहकांनी दूधाच्या पिशव्या व्यवस्थित ‘सीलबंद’ आहेत कि नाही, हे पडताळून पहावे. आस्थापनांच्या दुधाच्या मूळ ‘सीलबंद’ पिशव्या कोपर्याच्या बाजूने धारदार असतात. भेसळयुक्त दूधाच्या पिशव्यांमध्ये कोपर्याकडील भाग धारदार नसतो. ग्राहकांना ‘सीलबंद’ दुधाच्या पिशव्यांच्या दर्जाविषयी शंका असल्यास ‘एफ्.डी.ए.’च्या १८०० २२२ ३६५ या साहाय्य केंद्राच्या क्रमांकावर संपर्क साधावा. |