पुणे येथे नदी संवर्धनासाठी साखळी उपोषणानंतर मूकमोर्चा !

नदीकाठ सुधार प्रकल्पाला नदीप्रेमींचा विरोध !

नदी संवर्धनासाठी  नदीप्रेमींचा मूकमोर्चा

पुणे – नदी विकासाच्या नावाखाली नद्यांचे होणारे काँक्रिटीकरण, त्यात सोडले जाणारे सांडपाणी, कचरा या विरोधात नदीप्रेमींनी २७ फेब्रुवारी २०२२ या दिवशी साखळी उपोषण चालू केले होते. त्या उपोषणाला २०० दिवस पूर्ण झाले, तरी महापालिका प्रशासनाला जाग आली नाही; म्हणून शहरातील नदीप्रेमी कार्यकर्ते आणि नागरिक यांनी नुकतेच गरवारे महाविद्यालय ते पुणे महापालिका भवन असा मूक मोर्चा काढला होता. नदीकाठ सुधार प्रकल्पाला विरोध दर्शवत ‘आपली नदी स्वच्छ आणि सुंदर रहावी, यासाठी पुणेकरांनी यात सहभागी व्हावे’, असे आवाहन करण्यात आले आहे.

नदीकाठ सुधार प्रकल्पाला विरोध का ?

पुण्यातील नद्या सध्या मृतावस्थेत असतांना पुणे महानगरपालिकेने मात्र त्यांना सजवण्याचा घाट घातला आहे. पुणे हे अत्यंत पूरप्रवण शहर आहे. नदीकाठ सुधार प्रकल्पाच्या आराखड्यात म्हटले आहे की, हा प्रकल्प पूरनियंत्रित करण्यासाठी आहे; पण प्रत्यक्षात त्यांच्या अहवालाप्रमाणेच पूरपातळ्या किमान ५ फुटांनी वाढणार आहेत. नदीकाठ सुधार प्रकल्पांतर्गत करदात्यांचे ५ सहस्र कोटी रुपये खर्चून पुण्यातील नद्यांचे पात्र मोठ्या प्रमाणावर काँक्रिटच्या भिंती उभारून अरुंद करण्यात येणार आहे; पण यातून पुराचा धोका वाढेल.

पुणे महानगरपालिकेची ३ बंधार्‍यांच्या साहाय्याने प्रवाह अडवून तळी सिद्ध करून ‘बोटिंग’ करण्याची योजना आहे. सध्या नदीतील सांडपाणी बघता पुणे महानगरपालिकेची ही कल्पना भीषण आहे. ‘पुण्याची पावसाळ्यातील सद्यःस्थिती बघता काँक्रिटीकरण हिताचे आहे’, असे नक्कीच म्हणता येणार नाही. नुकतेच जिथे वनाज मेट्रोचे स्थानक झाले आहे, तिथे रस्त्यावर पूर आला होता. अशा परिस्थितीमध्ये पाणी वहायची हक्काची जागा आहे, तिथे काँक्रिटीकरण किती उचित आहे ? यासाठी पुण्यातील जागरूक नागरिक या प्रकल्पाला विरोध करत आहेत.

नदीप्रेमींच्या मागण्या !

१. नद्यांमधील सर्व अतिक्रमणे काढली पाहिजेत.
२. सर्व नद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत.
३. नद्यांचा काटछेद कुठेही अल्प होता कामा नये.
४. नद्यांचे पुनरुज्जीवन काँक्रिटने न करता पर्यावरणपूरक मार्गानेच पूर्ण झाले पाहिजे.