आष्टा (सांगली) येथे गोरक्षकांनी धाड टाकून पकडले ३ टन गोवंशियांचे मांस : ५ जणांना अटक

आष्टा (जिल्हा सांगली) – आष्टा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरच गोवंशियांची कत्तल होत असल्याचे वृत्त गोरक्षकांना समजले. यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, ५ घंटे अथक प्रयत्न केल्यावर मुंबई येथील अधिवक्ता आणि गोरक्षक आशिष बारीक, श्री. प्रतीक माळी, सांगलीचे वैद्य नितेश ओझा, श्री. अंकुश गोडसे, श्री. दीपक शिंदे या सर्वांनी धाड टाकून गोवंशियांचे ३ टन मांस पकडले. या वेळी तेथे १५० लहान गोवंशियांनाही कापलेले आढळून आले. धाड टाकलेल्या ठिकाणी मुंडके, रक्त, मांस, अवयव, त्वचा पोलिसांनी कह्यात घेऊन त्याची विल्हेवाट लावली. या कारवाईत ५ जणांना अटक करण्यात आली आहे.

धाडीची माहिती मिळताच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे स्थानिक कार्यकर्तेही घटनास्थळी आले आणि त्यांनीही गोरक्षकांना साहाय्य केले. या कारवाईतील मांसाचे नमुने जनुकीय तत्त्व पडताळणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या गुन्ह्याची नोंद आष्टा पोलीस ठाण्यात झाली असून याचे पुढील अन्वेषण चालू आहे.

संपादकीय भूमिका

गोवंश हत्याबंदी कायदा असतांना गोवंशियांची कत्तल चालूच असणे, संतापजनक !