महंत नरेंद्र गिरी यांच्या खोलीत सापडले ३ कोटी रुपयांची रोकड आणि ५० किलो सोने !

महंत नरेंद्र गिरी मृत पावल्यानंतर १ वर्षाने त्यांच्या खोलीची सीबीआयकडून पडताळणी

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथील अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या बाधंबरी मठामध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) पथकाने परिषदेचे माजी अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांची सीलबंद खोली उघडून तपासणी केली असता खोलीत ३ कोटी रुपये रोख आणि ५० किलो सोने, हनुमानाचा सोन्याचा मुकुट, कडे आणि बाजूबंद सापडले आहेत. हे सर्व लोखंडी कपाटात ठेवले होते. तसेच कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रे आणि ९ क्विंटल देशी तूपही सापडले.

नरेंद्र गिरि यांच्या निधनाला एक वर्ष झाल्यानंतर सीबीआयने त्यांचा मृतदेह ज्या खोलीत सापडला तिची तपासणी केली. महंत नरेंद्र गिरि यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला होता. तसेच एक चिठ्ठीही सापडली होती. या प्रकरणी महंत नरेंद्र गिरी यांचे शिष्य आनंद गिरि, आराध्या प्रसाद तिवारी आणि त्यांचा मुलगा संदीप तिवारी यांना अटक करण्यात आली आहे. बाघंबरी मठाचे विद्यमान महंत बलवीर गिरि यांनी खोली उघडण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. यानंतर सीबीआयने ही खोली उघडली.