पितृपक्षाच्या निमित्ताने…
१. सूर्याला अर्घ्य देत असतांना आकाशात अनेक पितरांचे लिंगदेह एकत्र आल्याचे जाणवणे आणि पितरांना पुढील गती मिळण्यासाठी दत्तगुरूंना आपोआप प्रार्थना होणे
गेल्या वर्षी २१.९.२०२१ या दिवशी पितृपक्षाला प्रारंभ झाला. या दिवशी मी सूर्याला अर्घ्य देत असतांना मला आकाशात सूर्यनारायणाचे दर्शन झाले. त्या वेळी मला आकाशात अनेक लिंगदेह एकत्र आल्याचे जाणवले. काही लिंगदेह गडद करड्या रंगाचे होते, तर काही फिकट करड्या रंगाचे होते. ‘पितृपक्षाला प्रारंभ झाला असल्याने हे सर्व लिंगदेह पितृलोकातून आलेले असतील’, असे मला वाटले. तेव्हा माझ्याकडून दत्तगुरूंना आपोआपच प्रार्थना झाली, ‘हे गुरुदेव दत्ता, माझे आई-वडील आणि माझे दोन पिढ्यांचे पितर यांना सद्गती मिळू दे. माझ्या कुळात कुणाकडून श्राद्धविधी योग्य पद्धतीने होत नसल्यास पितर अतृप्त राहिले असतील, तर त्यांच्या चरणी या जिवाची क्षमायाचना पोचून त्यांना पुढची गती प्रदान कर.’ त्यानंतर मी त्या सर्व पितरांना कृतज्ञतापूर्वक साष्टांग नमस्कार केला.
२. ‘पितरांना पुढची गती मिळण्यासाठी तूच तुझी ऊर्जा त्यांना प्रदान कर’, अशी सूर्यनारायणाला प्रार्थना केल्यावर लिंगदेहांनी आशीर्वाद देणे आणि नंतर ते आपोआप अदृश्य झाल्याचे जाणवणे
त्यानंतर माझ्याकडून सूर्यनारायणाला प्रार्थना झाली, ‘हे सूर्यनारायणा, जे पितर पुढची गती प्राप्त होण्यासाठी येथे आले आहेत, त्यांच्यासाठी श्राद्ध करून पिंडदान करणे मला शक्य नाही. त्यांना पुढची गती मिळण्यासाठी तूच तुझी ऊर्जा त्यांना प्रदान कर.’ ही प्रार्थना झाल्यावर मी पुन्हा सूर्यनारायणाचे दर्शन घ्यायला आकाशाकडे पाहिले असता आकाशात पूर्वी दिसत असणार्या लिंगदेहांनी मला आशीर्वाद दिला आणि नंतर ते आपोआप अदृश्य झाल्याचे मला जाणवले. त्या वेळी माझ्या संपूर्ण शरिरात एक ऊर्जा प्रवाहित झाल्याचेही मला जाणवले.
प्रश्न : ही अनुभूती येण्याआधी मी पितृपक्षानिमित्त प्रसारमाध्यमांवर (सोशल मिडियावर) प्रसाराची सेवा करतांना ‘कोणता मजकूर घेऊ शकतो ?’, याविषयी अभ्यास करत होते. त्या वेळी ‘आपण आपल्या मागील न्यूनतम २ पिढ्यांच्या पितरांना गती प्राप्त होण्यास प्रार्थना करून पितरांचे कृपाशीर्वाद घेऊ शकतो’, हे सूत्र माझ्या वाचनात आले होते.
वरील सूत्र लिहितांना त्याचा कार्यकारणभाव माझ्या लक्षात आला. आपल्या २ पिढ्या पूर्वीच्या पूर्वजांचे आपल्याशी थोडे घनिष्ठ देवाण-घेवाण हिशोब असतात. त्यांच्यासाठी श्राद्ध करू शकत नसल्यास सूक्ष्मातून त्यांना पिंडदान देऊन त्यांची मनोभावे सूक्ष्मातून पाद्यपूजा करून पितरांना संतुष्ट करू शकतो, तसेच दत्तगुरूंना ‘पितरांना पुढची गती मिळावी’, यासाठी कळकळीने प्रार्थना करू शकतो. मला सुचलेले सूत्र योग्य आहे का ?
– कु. रजनीगंधा
उत्तर : या प्रश्नाचे उत्तर योग्य आहे. – (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (२८.९.२०२१)
– कु. रजनीगंधा कुर्हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.९.२०२१)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |