ब्रिटनला मागे टाकत भारत जगातील ५ वी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था !

नवी देहली – अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी यांच्यानंतर भारत आता जगातील ५ व्या क्रमांकाचा मोठ्या अर्थव्यवस्थेचा देश बनला आहे. भारताने ब्रिटनला मागे टाकून हा पल्ला गाठला आहे. ब्रिटन सध्या अनेक संकटातून जात आहे, ज्यात महागाई आणि राजकीय अस्थिरता यांचा समावेश आहे. कृषी आणि सेवा क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) देशाचा सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) १३.५ टक्के राहिला. या वाढीसह भारत ही जगातील सर्वांत वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था ठरली आहे. याच काळात चीनचा विकास दर ०.४ टक्के राहिला आहे. वित्त सचिव सोमनाथन् यांनीदेखील सांगितले होते की, भारतीय अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षात ७ टक्क्यांहून अधिक विकास दर गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीनुसार वर्ष २०१९ मध्येही, भारताची अर्थव्यवस्था ५वी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनली आणि ती २.९ ट्रिलियन डॉलर इतकी राहिली. त्याच वेळी ब्रिटनची अर्थव्यवस्था २.८ ट्रिलियन डॉलर्ससह सहाव्या स्थानावर आली होती.