ऑस्ट्रेलियातील साऊथ वेल्स आणि व्हिक्टोरिया या राज्यांमध्ये नाझींच्या चिन्हावर बंदी

हिंदु, जैन आणि बौद्ध धर्मियांना स्वस्तिक वापरण्याची अनुमती

कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियातील साऊथ वेल्स आणि व्हिक्टोरिया या २ राज्यांमध्ये नाझींच्या ‘हाकेनक्रूझ’ या चिन्हावर बंदी घालण्यात आली आहे. या राज्यांत नाझींचे चिन्ह कोणत्याही प्रकारे दाखवणे हा गुन्हा ठरणार आहे; मात्र या दोन्ही राज्यांमध्ये हिंदु, जैन आणि बौद्ध धर्मियांना स्वस्तिक वापरण्याची अनुमती देण्यात आली आहे. नाझींचे ‘हाकेनक्रूझ’ चिन्ह हे उलट्या स्वस्तिकाप्रमाणे असते. त्यामुळे बहुतांश वेळा नाझींच्या चिन्हावर बंदी घालतांना स्वस्तिकावरही बंदी घाला’, अशी मागणी विदेशांत केली जाते. अलीकडेच फेब्रुवारी २०२२ मध्ये कॅनडाच्या संसदेमध्ये ‘न्यू डेमोक्रॅटिक पार्टी’चे खासदार आणि खलिस्तानवादी विचारसरणीचे खासदर जगमीत सिंह यांनी कॅनडामध्ये स्वस्तिकावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

१. ऑस्ट्रेलियातीलच क्वीन्सलँड आणि तस्मानिया या राज्यांमध्येही नाझींच्या चिन्हावर बंदी घालण्याविषयी चर्चा चालू आहे.

२. यापूर्वी जुलै २०२० मध्ये फिनलंडने त्याच्या वायूदलाच्या चिन्हावरून स्वस्तिक काढून टाकले होते. गेल्या वर्षी अमेरिकेच्या मेरीलँड राज्यातही स्वस्तिकावर बंदी घालण्यासाठी विधेयक सादर करण्यात आले होते. त्या वेळी हिंदु संघटनांनी याला कडाडून विरोध केला होता.

३. न्यू साउथ वेल्समधील ‘ज्यू बोर्ड ऑफ डेप्युटीज’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅरेन बार्क्स म्हणाले की, ‘हाकेनक्रूझ’ हे नाझींचे प्रतीक आहे. यात हिंसा दर्शवली जाते. कट्टरपंथी संघटना त्याचा वापर त्यांच्या संघटनेत भरतीसाठी करतात. आमच्या राज्यात त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची चर्चा पुष्कळ दिवसांपासून चालू होती. आता गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा मिळेल.