पणजी, २५ जुलै (वार्ता.) – विधवा धर्म बंद करण्यासाठी कायदा करण्यासंबंधीच्या सूत्रावर पुढील अधिवेशनात सविस्तर चर्चा करून त्यावर योग्य निर्णय घेतला जाणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. काँग्रेसचे आमदार युरी आलेमाव यांनी विधानसभेत शून्य प्रहराच्या वेळी विधवा धर्म बंद करण्यासाठी कायदा करण्याच्या लक्षवेधी सूचनेच्या अंतर्गत केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे आश्वासन दिले.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘विधवा धर्मासंबंधी सध्या कोणताही कायदा अस्तित्वात नाही. आम्ही आता सुशिक्षित झालो आहोत. आम्हाला आता असे प्रकार पुढे घडू नयेत, यासाठी जनजागृती करावी लागणार आहे. विधवांनाही सन्मान दिला पाहिजे. हे माझे वैयक्तिक मत आहे.’’ तत्पूर्वी आमदार युरी आलेमाव म्हणाले, ‘‘राज्यातील विधवांसमवेत केला जाणारा भेदभाव आणि गैरवर्तन, तसेच त्यांच्यावर होणारे अत्याचार यांविषयी लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याविषयी कोणत्याही नोंदणीकृत तक्रारी नसल्या, तरी भेदभाव, अत्याचार आणि गैरवर्तन हे प्रथा, परंपरा आणि धार्मिक किंवा सामाजिक प्रथेचा भाग म्हणून गृहित धरले जाते. अन्यायकारक प्रथांना आळा घालण्यासाठी सरकारने कायदा आणण्याचा विचार केला पाहिजे.’’ राज्यातील धारगळ, उगे, लोलये, वेलिंग-प्रियोळ-कुंकळ्ळी, सुरावली आणि इतर काही ग्रामपंचायती यांनी यापूर्वी त्यांच्या ग्रामसभांमध्ये विधवा धर्म अन्यायकारक असल्याचा दावा करून याच्या विरोधात ठराव संमत केलेले आहेत.
विधवा धर्माचे पालन चुकीचे, असे म्हणणे योग्य आहे का ?
सध्याच्या २१ व्या शतकातील हिंदु महिला पुष्कळ स्वतंत्र आहेत. घर आणि नोकरी अथवा कार्यालयीन काम आदी दोन्ही कार्य त्या उत्तमरित्या सांभाळतात. सासरी किंवा माहेरची मंडळीही त्यांना त्यात साथ देतात. विधवा महिलांनाही सध्याच्या समाजाने स्वीकारलेले आहे. पतीनिधनानंतर पत्नी सौभाग्यालंकारांचा त्याग करते. तिच्यावर कुणीही बळजोरी करतांना दिसत नाही. पतीनिधनानंतर तिने सौभाग्य अलंकार घालण्यावर फारसा कुणाचा आक्षेपही नसतो. त्यामुळे त्यांची विटंबना होण्याचे प्रकार नगण्य आहेत. समजा सौभाग्यालंकार काढतांना कुणाकडून चूक झाली; म्हणून विधवाधर्माचे पालन करणे चुकीचे असे म्हणणे योग्य होईल का ? एखाद्या स्त्रीला सौभाग्य अलंकार काढण्याची इच्छा नसेल,
तर तिला वाळीत टाकले जात नाही किंवा तिच्यावर अन्याय केला जात नाही. मुळात आधुनिक भारतात विधवा धर्माचे पालन केल्यामुळे घोर अन्याय झाल्याच्या घटना आहेतच किती ? त्यासाठी कायदा केला, तर ज्यांना पतीच्या निधनानंतर धर्मपालन करायचे आहे; त्यांच्यावर हा अन्याय होणार नाही का ?
सध्याच्या आधुनिक सुधारणावादी महिला स्वतः कुंकू, बांगड्या आदी अलंकार घालत नाहीत. स्वतः अलंकार न घालणार्या या सुधारणावादी महिला ‘विधवांचे अलंकार काढू नका’, असे म्हणतात. या विधानाला ‘ख्रिस्ती धर्माचा वास येतो’, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. धर्मांतराचे अमाप प्रकार उघडकीस येत असलेल्या गोवा राज्यात तरी या म्हणण्याला कुणी नाकारू शकत नाही.