जागतिक आरोग्य संघटनेकडून ‘मंकीपॉक्स’मुळे जागतिक आणीबाणी घोषित !

मंकीपॉक्स

जिनिव्हा (स्वित्झर्लंड) – जगातील ७० हून अधिक देशांत ‘मंकीपॉक्स’ आजाराची साथ पसरल्याने जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आणीबाणी घोषित केली आहे. या संघटनेचे महासंचालक डॉ. ट्रेडॉस घेब्रेयेसस यांनी संघटनेच्या आपत्कालीन समितीच्या सदस्यांमध्ये एकमत नसतांनाही जागतिक आणीबाणी घोषित करण्याचा निर्णय घेतला. या संघटनेच्या प्रमुखाने सदस्यांमध्ये एकमत नसतांना अशी कृती करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमेरिकेच्या केंद्रीय रोगनियंत्रण आणि प्रतिबंध संस्थेच्या आकडेवारीनुसार जगातील ७४ देशांमध्ये मे २०२२ पासून १६ सहस्रांहून अधिक रुग्णांचे निदान करण्यात आले आहे; मात्र मृत्यू केवळ आफ्रिकी देशांतच झाले आहेत. भारतात आतापर्यंत ४ रुग्ण आढळले आहेत.

१. ट्रेडॉस म्हणाले की, संपूर्ण जगभर एका साथीचा उद्रेक झाला असून हा रोग नव्या प्रकारांतून वेगाने पसरला आहे. त्याविषयी आपल्याला अतिशय अल्प माहिती आहे. अशा परिस्थितीला आंतरराष्ट्रीय आरोग्य नियम आणि निकष लागू होतात.

२. मंकीपॉक्स हा रोग अनेक दशकांपासून मध्य आणि पश्‍चिम आफ्रिकेच्या काही भागांत आढळून येत आहे; परंतु आफ्रिका खंडाबाहेर तो पसरल्याची माहिती मे २०२२ पर्यंत कुणालाही नव्हती. युरोप, उत्तर अमेरिका आणि अन्यत्र या रोगाचे रुग्ण आढळल्यानंतर त्याची साथ पसरल्याचे लक्षात आले.

कसा पसरतो मंकीपॉक्स ?

मंकीपॉक्स हा संसर्गजन्य आजार आहे. डोळे, नाक आणि तोंड यांच्या माध्यमांतून तो शरिरात प्रवेश करतो. तसेच माकड, उंदीर, खार आदी प्राण्यांच्या चावण्यामुळे तो होऊ शकतो. कच्चे मांस खाल्ल्यानेही हा आजार होऊ शकतो. ब्रिटनमध्ये सापडलेल्या पुरुष रुग्णांमध्ये बहुतेक जण समलैंगिक आहेत. त्यामुळे त्यांच्यातील संबंधांमुळेही तो पसरत असल्याचे सांगितले जात आहे.