काशी विश्‍वनाथ मंदिरामध्ये अधिक शुल्क भरून दर्शन देणारी ‘सुगम दर्शन’ योजना बंद करावी ! – हिंदु जनजागृती समिती

काशी विश्‍वनाथ मंदिर

वाराणसी (उत्तरप्रदेश) – काशी विश्‍वनाथ मंदिराच्या रांगेत उभे न रहाता भाविकांना दर्शन घेता यावे, यासाठी ‘सुगम दर्शन’ योजनेत प्रति व्यक्ती ५०० रुपये आणि सोमवारी ७५० रुपये घेणे पूर्णपणे अन्यायकारक आहे. त्यामुळे अनेक प्रश्‍न उपस्थित होऊ शकतात. प्रथमत: या योजनेमुळे भाविकांमध्ये भेदभावाची भावना निर्माण होऊ शकते. दूरवरून देवाच्या दर्शनासाठी येणार्‍या गरीब भक्ताला ५०० ते ७५० रुपये देणे शक्य होणार नाही; मात्र श्रीमंत भक्त पैसे देऊन दर्शन घेऊ शकतील. देव सर्वांचा आहे आणि देवाच्या दृष्टीने सर्व भक्त समान आहेत. त्यामुळे भक्तांनीही त्यांचे दर्शन त्याच पद्धतीने घ्यावे. तो गरीब असो वा श्रीमंत, नेता असो वा कार्यकर्ता, देवदर्शनाची पद्धत सर्वांसाठी सारखीच असावी, असे आमचे मत आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

या पत्रकात पुढे म्हटले आहे की,

१. गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येकासाठी वेळ महत्त्वाची असते. यामध्ये कोणताही भेदभाव होता कामा नये. यापूर्वी ‘सुगम दर्शन’साठी ३०० रुपये आकारले जात होते. आता ते श्रावण मासासाठी ५०० रुपये करण्यात आले असून श्रावणातील सोमवारसाठी ७५० रुपये घेतले जात आहेत. ‘मंदिर हे श्रद्धा आणि भक्ती यांचे केंद्र आहे’, हे मंदिर विश्‍वस्तांनी लक्षात ठेवावे.

२. ‘पैसे देऊन ‘सुगम दर्शन’ ही योजना बंद करावी’, असे आम्हाला वाटते. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे चांगले सरकार चालवत आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने नेहमीच धर्माच्या आणि हिंदूंच्या हिताचे निर्णय न्याय्य पद्धतीने घेतले आहेत. भाविकांच्या हितासाठी ते या प्रकरणाची नक्कीच दखल घेतील, असा आम्हाला विश्‍वास आहे.