वागदे येथे ग्राहकाचे चुकीचे वीजदेयक भरण्याचा अधिकारी आणि ‘वायरमन’ यांना आदेश

वीजमीटर जोडण्यापूर्वीच ग्राहकाला आले ८१० रुपयांचे वीजदेयक

कणकवली – वीज वितरण आस्थापनाने वागदे येथील किशोर काशीराम घाडीगांवकर यांच्या घरी २१ जुलै या दिवशी वीजमीटर जोडला; मात्र त्यापूर्वी १० दिवस त्यांना चुकीच्या पद्धतीने ८१० रुपयांचे विजेचे देयक देण्यात आले. या घटनेमुळे वीज वितरण आस्थापनाचा गलथान कारभार दिसून येतो. याविषयी भाजपचे तालुका सरचिटणीस तथा पंचायत समितीचे माजी उपसभापती महेश गुरव यांनी वीज वितरण आस्थापनाच्या अधिकार्‍यांना खडसावले. त्यामुळे अखेर वीज वितरण आस्थापनाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी संबंधित अधिकारी आणि वायरमन यांना घाडीगांवकर यांना पाठवलेले वीजदेयक भरण्याचा आदेश दिला. या वेळी भाजपचे कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे, किशोर घाडीगांवकर आदींसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

संपादकीय भुमिका

अशा प्रकारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडूनच चुकीच्या कामांची भरपाई करून घेतल्यास प्रशासकीय कामे व्यवस्थित आणि गुणवत्ताधारक होतील !