आर्थिक अपहाराच्या प्रकरणी तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद

मेधा पाटकर

मुंबई – मध्यप्रदेशातील ‘नर्मदा बचाव’ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर यांच्याविरुद्ध आर्थिक अपहाराच्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बरवाणी पोलिसांनी मेधा पाटकर यांच्यासह त्यांच्या समवेत काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थांमधील ११ जणांविरुद्धही गुन्हा नोंदवला आहे. प्रीतम बडोले यांनी केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

‘नर्मदा नवनिर्माण अभियान ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेद्वारे करण्यात येणारी सामाजिक कार्ये आणि आदिवासी मुलांचे शिक्षण, यांसाठी प्राप्त झालेला निधी पाटकर यांनी विकास प्रकल्पांच्या विरोधासाठी वापरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याचे अन्वेषण करण्यासाठी विभागीय पोलीस अधिकारी रूपरेखा यादव यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलीस अन्वेषण पथक नियुक्त करण्यात आले आहे. नंदुरबार येथील ‘नर्मदा नवनिर्माण अभियान ट्रस्ट’चे कार्यालय आणि बडवाणी येथील कार्यालय येथे अन्वेषणासाठी पोलिसांची पथके पाठवण्यात आली आहेत. मध्यप्रदेश येथील पोलीस अधीक्षक दीपक कुमार शुक्ला यांनी बरवाणी येथील ‘नर्मदा बचाव आंदोलना’च्या कार्यालयात नोटीस पावण्यात आली असल्याचे सांगितले.