अफगाणिस्तानातून नवी मुंबईत आणलेले ३६३ कोटी रुपयांचे हेरॉइन पोलिसांच्या कह्यात !

नवी मुंबई, १७ जुलै (वार्ता.) – कंटेनरमध्ये लपवून आणलेले ३६३ कोटी रुपये किमतीचे हेरॉइन (अमली पदार्थ) नवी मुंबई पोलिसांनी न्हावा-शेवा बंदरातून कह्यात घेतले आहे.

अफगाणिस्तान येथून दुबईमार्गे हा अमली पदार्थ आणण्यात आल्याची शक्यता आहे. याचे वजन ७२ किलो ५१८ ग्रॅम इतके आहे. तस्करांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

न्हावा शेवा बंदरात परदेशातून आलेल्या एका कंटनेरमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी नवी मुंबई पोलिसांना दिली होती. त्यानंतर एक मार्बलने भरलेला कंटेनर कुणीही घेण्यासाठी न आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी हा कंटेनर कह्यात घेऊन त्याची पडताळणी केली. त्यामध्ये आतील बाजूच्या पत्र्यात वेल्डिंग करून आणखी एक पत्रा जोडल्याचे आढळून आले. या दोन्ही पत्र्यांच्या मध्ये ही अमली पदार्थांची पाकिटे लपवण्यात आली होती.