अमरावती येथे दूषित पाण्याचे ३ बळी; ८० जणांची प्रकृती खालावली !

अमरावती – जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील मेळघाटच्या पाचडोंगरी येथे दूषित पाणी प्यायल्याने कॉलरासदृश आजारामुळे तिघांचा मृत्यू झाला, तर ८० जणांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क करून कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. मृताच्या कुटुंबियांना साहाय्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. येथील खासदार सौ. नवनीत राणा यांनी रुग्णांची विचारपूस करून त्यांना धीर दिला. या वेळी सर्व वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.

सौ. नवनीत राणा पत्रकारांशी बोलतांना म्हणाल्या, ‘‘महाविकास आघाडी सरकारच्या आदेशामुळे गावातील पाणीपुरवठा करणार्‍या पाण्याच्या टाकीचा वीजपुरवठा खंडित केल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. दायित्वशून्य अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. लोक अस्वच्छ पाणी घेत असतांना प्रशासन काय करत होते ? वीज विभागाने पूर्वसूचना न देता वीज कापली. इतकी मोठी घटना घडूनही संबंधित विभागाचे अधिकारी वेळेवर पोचले नाहीत.’’