मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे दळणवळण बंदी चालू झाल्यापासून सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे देहली, हरियाणा, मध्यप्रदेश आणि राजस्थान या ४ राज्यांतील साधकांसाठी प्रतिदिन सकाळी ७.३० ते ८ या कालावधीत ‘ऑनलाईन’ भाववृद्धी सत्संग घेतात. या सत्संगात सद्गुरु पिंगळेकाका भावप्रयोग आणि साधनेचे प्रयत्न वाढवण्यासाठी काही सूत्रे सांगतात. ‘दळणवळण बंदीच्या काळात सर्व साधकांची भाव, भक्ती आणि श्रद्धा वाढावी’, या दृष्टीने हा सत्संग चालू केला होता. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने अजूनही तो सत्संग चालू आहे.
७.७.२०२१ या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या सत्संगात सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन पुढे दिले आहे.
१. प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकतांना मनात निरंतर ईश्वराचा ध्यास असला पाहिजे !
आपण भ्रमणभाषवर ‘प.पू. बाबांची (प.पू. भक्तराज महाराज यांची) प्रासादिक भजने लावून ठेवतो; पण ‘त्या भजनांप्रती आपला भाव आहे कि नाही ?’, हे आपण पहायला पाहिजे. भजन म्हणजे ‘भज मन’, म्हणजे मनात निरंतर ईश्वराचाच ध्यास असला पाहिजे.
२. श्री गुरु मनात येण्यासाठी आपले मन शुद्ध करायला हवे !
श्री गुरु एखाद्या साधकाच्या घरी जातात, तेव्हा साधक त्याचे संपूर्ण घर शुद्ध आणि स्वच्छ करतात. आपल्या मनात श्री गुरु येण्यासाठी आपल्याला आपले मन असेच शुद्ध करायला पाहिजे. मनुष्याचे मन चंचल आहे. ते आपल्याला जाणायचे आहे. आपल्याला आपले मन श्री गुरुचरणी समर्पित करायचे आहे. त्यामुळे देह आणि मन यांच्या शुद्धीला आरंभ होतो.
३. साधकाच्या हृदयात भक्ती वाढू लागल्यावर श्री गुरु त्याच्या हृदयात विराजमान होत असणे आणि त्यामुळे साधकाला आनंद मिळून त्याचे मन अपेक्षाविरहित होणे
साधकाच्या हृदयमंदिरात भावभक्तीचा सुगंध पसरू लागतो. तेव्हा सद्गुरु त्याच्या हृदयात विराजमान होतात. जेव्हा सद्गुरु हृदयात येतात, तेव्हा साधकाच्या मनात आनंदाचा झरा वाहू लागतो. तो आनंद अनुभवल्यानंतर त्याच्या मनात कोणतीच अपेक्षा रहात नाही. ‘कोणतेही पद मिळाले नाही किंवा आध्यात्मिक पातळी वाढली नाही, तरी चालेल’, असे त्याला वाटते. ‘मला ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठायची आहे किंवा सेवेत दायित्वाचे पद मिळवायचे आहे’, अशी कोणतीच अपेक्षा त्याच्या मनात रहात नाही.
४. श्री गुरूंशी भक्तीने बांधले गेल्याचा आनंद जगातील कुठल्याही आनंदापेक्षा श्रेष्ठ आहे !
अशा अपेक्षाविरहित स्थितीला जाण्यासाठी श्री गुरुचरणी संपूर्ण समर्पित होता आले पाहिजे. कोणतीही अपेक्षा ठेवून भक्ती करायची नाही, तर श्री गुरूंप्रती मनात निरपेक्ष प्रेम अनुभवता यायला पाहिजे. अशा शुद्ध भक्तीने श्री गुरूंशी बांधले गेले पाहिजे. त्या आनंदासमोर बाकी सर्व जग तुच्छ आहे.
५. माया बाहेरच्या वस्तूंशी संबंधित आहे, तर आत्मा निर्गुण आहे.
६. ‘आपल्या हातून चूक झाली नसली, तरीही आपल्याला सांगितलेली चूक स्वीकारता आली पाहिजे’, हेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित आहे. आपल्याला श्री गुरूंचे आज्ञापालन करायचे आहे.
७. मुखाने नाम घेत हाताने सत्सेवा करावी. त्यामुळे आपल्या मनावर नामाचा संस्कार होतो आणि नाम अखंड चालू रहाते. आपल्याला साधना सूक्ष्म दृष्टीने जाणायची आहे.
– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे (१३.७.२०२१)
संकलक : कु. मनीषा माहूर, देहली सेवाकेंद्र (१३.७.२०२१)