मुंबई – जनहिताची कामे अडकून राहू नयेत, तसेच अतीवृष्टी आणि आपत्ती या घटनांमध्ये विभागांची कामे सुरळीतपणे पार पडावीत, यासाठी मंत्रीमंडळातील खात्यांचे फेरवाटप करण्यात आलेे. या वेळी अनुपस्थित ५ मंत्री आणि ४ राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांकडे सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला.
१. एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) ही खाती सुभाष देसाई यांच्याकडे, गुलाबराव पाटील यांच्याकडील पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग ही खाती अनिल परब यांच्याकडे, दादाजी भुसे यांच्याकडील कृषी आणि माजी सैनिक कल्याण खाते, तसेच संदिपान भुमरे यांच्याकडील रोजगार हमी, फलोत्पादन खाते ही दोन्ही मंत्र्यांची खाती शंकर गडाख यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. उदय सामंत यांच्याकडील उच्च आणि तंत्र शिक्षण खाते हे आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
२. राज्य मंत्र्यांकडील खातेवाटपातही पालट करण्यात आले आहेत. शंभूराज देसाई यांच्याकडील गृह आणि ग्रामीण खाते संजय बनसोडे यांच्याकडे, तर काँग्रेसचे मंत्री विश्वजित कदम यांच्याकडील वित्त, नियोजन, कौशल्य विकास आणि उद्योजकता, पणन ही खाती सतेज उपाख्य बंटी पाटील यांच्याकडे दिली असून त्याऐवजी त्यांच्याकडे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडील सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण ही खाती देण्यात आली आहेत.