परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असणारे नंदीहळ्ळी (जिल्हा बेळगाव, कर्नाटक) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. उत्तम कल्लाप्पा गुरव (वय ६१ वर्षे) !

श्री. उत्तम कल्लाप्पा गुरवकाका १८ वर्षांपासून वारकरी संप्रदायानुसार साधना करतात. मागील १० वर्षांपासून ते सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. ते ग्रंथप्रदर्शन लावण्याची सेवा करतात, तसेच इतर प्रासंगिक सेवांमध्येही त्यांचा सहभाग असतो. ते त्यांची पत्नी सौ. उज्ज्वला (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांना सेवेत साहाय्य करतात. काकांचा मोठा मुलगा श्री. सुकेश मंगळुरू सेवाकेंद्रात पूर्णवेळ साधना करतो. त्यांचा लहान मुलगा श्री. कुशल गुरव, मुलगी सौ. रोहिणी वाल्मीक भुकन (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आणि जावई श्री. वाल्मीक भुकन रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करत आहेत. साधिकेला जाणवलेली गुरवकाकांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.  

१. ‘गुरवकाकांचा स्वभाव शांत आहे. ‘त्यांना कधी कोणत्या गोष्टीचा राग आला किंवा ते कुणाशी मोठ्या आवाजात बोलले’, असे दिसत नाही.

२. मुलांकडून कोणतीही अपेक्षा नसणे

श्री. उत्तम गुरव

काकांचा शेतीचा व्यवसाय आहे; पण ‘मुलांनी घरी थांबून शेतीसाठी साहाय्य करावे’, अशी त्यांची अपेक्षा नसते. ‘आपली मुले पूर्णवेळ साधना करतात’, याबद्दल त्यांना फार कृतज्ञता वाटते. त्यांच्या मुलांनी लग्न करावे; म्हणून त्यांना नातेवाईक सांगतात; पण ‘मुलांनी लग्न करावे’, अशी काकांची अपेक्षा नाही.

३. ‘काका सतत अंतर्मुख असून ते देवाच्या अनुसंधानात असतात’, असे मला वाटते.

४. काकांच्या बोलण्यात पुष्कळ निरागसता आणि नम्रता आहे. ‘त्यांच्यामध्ये अहं फारच अल्प आहे’, असे जाणवते.

५. भाव

सौ. तारा हर्षवर्धन शेट्टी

५ अ. भावपूर्ण देवपूजा करणे : काका प्रतिदिन भावपूर्ण देवपूजा करतात. ‘पूजा करत असतांना प्रत्यक्ष देव आपल्या समोर उभा आहे’, असा त्यांचा भाव असतो. त्यांचे देवघर पाहिल्यावर आपलीही भावजागृती होते. ‘त्यांचा कुलदेव ‘श्री ज्योतिबा’ याचे चित्र सजीव झाले आहे’, असे मला वाटते. ‘देवाला फुले मिळावीत’, यासाठी त्यांनी फुलांची बाग लावली आहे. ते झाडांची प्रेमाने काळजी घेतात. ते त्यांच्याशी बोलतात. ‘वर्षातील एकही दिवस देवाला वहाण्यासठी फुले मिळाली नाहीत’, असे होत नाही.

५ आ. ‘पू. रमानंदअण्णा यांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले घरी आले आहेत’, असा भाव ठेवून सेवा करणे : मागील आठवड्यात पू. रमानंदअण्णा (सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा) काकांच्या घरी येणार होते. पू. अण्णा घरी येण्याच्या आदल्या दिवशी रात्री २ वाजेपर्यंत ते घराची स्वच्छता करत होते. त्यांना कंबरदुखीचा त्रास आहे, तरीही त्यांनी ही सेवा केल्यावर त्यांना कोणताही त्रास झाला नाही. ‘हे सर्व श्री गुरूंनीच करवून घेतले’, असे त्यांना वाटत होते. पू. अण्णा घरी आल्यावर त्यांना पाहूनच काकांची भावजागृती झाली. ‘पू. अण्णांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले आपल्या घरी आले आहेत’, असा त्यांचा भाव होता. दुपारपर्यंत ते त्याच भावस्थितीत होते.

५ इ. पू. रमानंदअण्णा यांना सोनचाफ्याची फुले देण्याची इच्छा काकांनी त्या झाडाजवळ व्यक्त करणे आणि पू. अण्णा घरी आल्यावर त्या झाडावर ३ फुले उमलणे : ‘पू. रमानंदअण्णा यांना सोनचाफ्याची फुले द्यावीत’, अशी काकांची इच्छा होती. काकांनी झाडाला तशी विनंतीही केली. पू. अण्णा काकांच्या घरी गेल्यावर झाडावर ३ फुले उमलली. ते पाहून काकांना कृतज्ञता वाटली आणि आनंद झाला. त्यांचा झाडांशी संवाद ऐकून आणि त्यांची बाग पाहूनही भावजागृती होते. ‘ते झाडांकडूनही साधना करवून घेत आहेत’, असे मला वाटते.

५ ई. शेतात काम करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले याचे छायाचित्र गहाळ होणे आणि ते काही मासांनी चांगल्या स्थितीत सापडल्यावर भावजागृती होणे : काकांकडे परात्पर गुरु डॉक्टरांचे एक लहान छायाचित्र होते. काका शेतात काम करत असतांना ते कुठेतरी पडले. ते शोधूनही सापडले नाही. त्यानंतर ७ – ८ मासांनंतर काका शेतात काम करतांना ते छायाचित्र मिळाले. छायाचित्राला ‘लॅमिनेशन’ नसतांनाही त्यावर कोणताही डाग पडला नव्हता. ते छायाचित्र मला दाखवत असतांना काका म्हणाले, ‘‘या छायाचित्राच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टर माझ्या समवेत सतत होते आणि आताही आहेत.’’ हे सांगतांना त्यांची भावजागृती झाली.

५ उ. काका वारकरी आहेत. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या माध्यमातून साक्षात् विठ्ठल त्यांच्या समवेत आहे’, असा त्यांचा भाव असतो.

५ ऊ. ‘श्री गुरु त्यांची काळजी घेत आहेत’, असा भाव त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत असतो. ‘त्यांच्या बोलण्यामुळे समोरच्या व्यक्तीमध्येही गुरुदेवांप्रती कृतज्ञताभाव निर्माण होतो’, असे मला वाटते.

५ ए. शेतात शेणखत घातल्यावर अकस्मात् पाऊस येणे, प्रार्थना केल्यावर पाऊस थांबणे आणि ‘गुरुदेवांनी ही अनुभूती दिली’, असे सांगतांना भावजागृती होणे : एकदा काकांना शेतात शेणखत घालायचे होते. त्यासाठी त्यांनी ते खत पसरून ठेवले होते. पाऊस येण्याआधी हे काम पूर्ण करायचे होते. त्यांच्या साहाय्याला कुणी नव्हते. ते काम करत असतांना अकस्मात् पावसाचे ढग येऊन थोडा पाऊस चालू झाला. ‘त्यामुळे खत वाहून हानी होणार’, अशी स्थिती निर्माण झाली. तेव्हा त्यांनी ‘देवा, हे शेत तुझेच आहे. तूच सांभाळून घे’, अशी शरणागतीने प्रार्थना केली आणि ते नामजप करू लागले. पुढील काही क्षणांतच पाऊस थांबला. ‘माझी मुले गुरुसेवा करत आहेत. त्यामुळेच गुरुदेवांनी ही अनुभूती दिली’, हे सांगत असतांना त्यांची भावजागृती होत होती.

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आज्ञापालन म्हणून न चुकता तळमळीने नामजप करणे

एकदा काकांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली होती. तेव्हा त्यांनी काकांना काळानुसार कृष्णाचा जप करायला सांगितला होता. काका तो नामजप प्रतिदिन करतात, तसेच नामजप लिहूनही काढतात. मागील आठवड्यात पू. रमानंदअण्णा काकांच्या घरी निवासाला होते. त्या वेळी रात्री ११.४५ वाजताही काका नामजप लिहीत होते. पू. अण्णांनी त्यांना याबद्दल विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘आज दिवसभर नामजप पूर्ण झाला नाही; म्हणून लिहून नामजप पूर्ण करत आहे.’’ यावरून ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे आज्ञापालन करण्याचा ते प्रयत्न करत आहेत’, असे माझ्या लक्षात आले.’

– सौ. तारा हर्षवर्धन शेट्टी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), कर्नाटक (१८.४.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक