हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ विशेष कार्यक्रम
बेंगळुरू (कर्नाटक) – अक्षय्य तृतीया हा दिवस भगवान परशुरामाचा जन्मदिवस आहे. या दिवशी वेदव्यासांनी श्रीगणेशाला महाभारताचे कथन केले होते. अक्षय्य तृतीया ही युगाप्रमाणेच जुनी आहे. हा सण जगभरातील सर्वच विशेष करून जैन आणि बौद्ध धर्मीयही साजरा करतात. या तिथीला केलेले दान आणि यज्ञ यांचा क्षय होत नाही; परंतु जेव्हा आपण दान करतो, तेव्हा आपण ते सत्पात्रे द्यायला हवे. अध्यात्मप्रसारासह राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना दान देणे, हे सत्पात्रे दान होय. सत्पुरुषांना दान करा आणि आध्यात्मिक लाभ घ्या, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अक्षय्य तृतीयेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका ‘ऑनलाईन’ विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचा लाभ ३ सहस्र ५०० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला.
वैशिष्ट्यपूर्ण
१. कार्यक्रमानंतर अनेक जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांनी ‘आम्ही अक्षय्य तृतीया कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणे साजरी करू’, असे सांगितले.
२. काही जणांनी सांगितले की, अक्षय्य तृतीयेचा अर्थ फक्त सोने खरेदी करणे, एवढेच आम्ही सीमित होतो; परंतु आम्हाला दानाचे महत्त्व आणि या सणाच्या व्यापकतेची जाणीव झाली.