बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर उभारण्यात येत असलेल्या पुलाचा मोठा भाग कोसळला !

जीवितहानी टळली !

८० फुटांवरून खाली कोसळलेले गर्डर 

बुलढाणा – समृद्धी महामार्गावर उभारण्यात येत असलेल्या पुलाचा मोठा भाग २७ एप्रिलच्या रात्री १ ते २ च्या दरम्यान कोसळला. एक मोठा गर्डर (पुलाचा आडवा सांगाडा) ८० फुटांवरून खाली कोसळला. काम चालू असतांना कामगार तेथून बाजूला गेल्यानंतर ही घटना घडली. कोसळलेल्या पुलाखाली एक ट्रकही दबला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. लोकार्पणाची घाई करण्यात येत असल्याने पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप केला जात आहे. आठवड्याभरात समृद्धी महामार्गावरील ही दुसरी दुर्घटना आहे.

१. दोन डोंगराळ भागांना जोडणारा हा पूल असून त्याची लांबी ५०० मीटर आहे. पुलाला सुमारे १५० खांब आहेत. त्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

२. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, समृद्धी महामार्गाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २ मे या दिवशी करण्यात येणार होते; मात्र ते सध्या लांबणीवर पडले आहे. नागपूरपासून १५ किमी अंतरावर वन्यजीवांसाठी रस्ता सिद्ध करण्यात आला आहे; मात्र त्यात असलेल्या चुका दुरुस्त केल्याविना महामार्ग चालू करता येणार नाही. त्यासाठी दीड मासाचा कालावधी लागेल. त्यामुळे लोकार्पणाचा दिनांक कळवण्यात येईल.

संपादकीय भूमिका

  • निकृष्ट दर्जाचे बांधकाम असणाऱ्या पुलावरून वाहतुकीस प्रारंभ झाल्यावर पुन्हा दुर्घटना घडल्यास त्याला उत्तरदायी कोण ?

  • निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणाऱ्या संबंधितांवर तत्परतेने कठोर कारवाई होणे आवश्यक !

  • लोकार्पणाच्या आधीच पुलाचा भाग कोसळतो, अशा घटना केवळ भारतातच होऊ शकतात !