देवद (पनवेल) येथे रहाणाऱ्या सनातनच्या साधिका श्रीमती शशिकला पै यांचा आज चैत्र शुक्ल एकादशी (१२ एप्रिल २०२२) या दिवशी ६७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त देवद येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. निनाद गाडगीळ यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट येथे देत आहोत.
श्रीमती शशिकला पै यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
श्रीमती शशिकला पै यांच्याशी सेवेच्या अनुषंगाने माझा बऱ्याच वेळा संपर्क येतो. मी त्यांना वर्ष २००४ पासून ओळखतो. त्यांनी देवद (पनवेल) येथील भूमी सनातन संस्थेला अर्पण दिली होती. (या भूमीवर आता संस्थेने आश्रम बांधला आहे.) देवद आश्रमाच्या शेजारी साधकांच्या निवासासाठी ताईंनी सनातन संकुलही बांधले आहे.
मला ताईंच्या समवेत सेवा करतांना त्यांची परात्पर गुरु डॉक्टरांवरील दृढ श्रद्धा आणि गुरुकार्याविषयीची तळमळ शिकायला मिळाली. समाजात अधिक वावर असल्याने ताईंचा स्वभाव पूर्वी पुष्कळ वेगळा होता; परंतु आता त्या स्वतःत साधकत्व आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याने त्यांच्यात काही प्रमाणात पालट जाणवत आहे.
१. संतांचा उल्लेख आदरपूर्वक न केल्याची स्वतःची चूक लक्षात आल्यावर त्याविषयी शशिकला पै यांना खंत वाटणे आणि त्यांनी साधकाकडून निरोप पाठवून संतांची क्षमायाचना करणे
एका सेवेसाठी ताईंचा एका संतांशी संपर्क झाला होता. त्या वेळी बोलतांना ताईंनी संतांचा उल्लेख आदरपूर्वक केला नव्हता. काही वेळाने स्वतःची चूक त्यांच्या लक्षात आली. तेव्हा त्यांना स्वतःकडून झालेल्या चुकीविषयी पुष्कळ खंत वाटत होती. त्या वेळी त्यांनी मला संपर्क केला आणि संतांची क्षमायाचना करत असल्याचा निरोप त्यांना आठवणीने द्यायला सांगितला.
२. ताई बांधकाम व्यावसायिक असूनही त्यांनी धान्य निवडण्याची सेवा मागून घेऊन ती भावपूर्ण करणे
कोरोना महामारीच्या काळात ताईंना आश्रमात सेवा किंवा नामजपादी उपाय यांसाठी येणे शक्य होत नव्हते. त्यामुळे त्यांनी आश्रमातून धान्य निवडण्याची सेवा मागून घेतली होती. त्यांनी पहाटे लवकर उठून ही सेवा केली. त्या बांधकाम व्यावसायिक असल्याने त्यांना ही सेवा करणे कठीण जात होते. ‘सेवा पालटून द्यायची का ?’, असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘ही सेवा करतांना माझा नामजप चांगला होतो. धान्यातील खडे काढतांना वाटते की, आपल्यातील स्वभावदोष असेच काढायचे आहेत. त्यामुळे मी हीच सेवा करू शकते.’’
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीची श्रद्धा आणि भाव
३ अ. सहज बोलण्यातूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या श्रीमती शशिकला पै ! : एकदा मी आणि सनातनचे साधक श्री. अभय वर्तक, असे दोघे एका प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकांकडे गेलो होतो. बांधकाम व्यावसायिकांनी श्रीमती शशिकला पै यांच्या समवेत काम केले असल्याने त्यांची विचारपूस केली आणि ते गमतीत म्हणाले, ‘‘ताई जर लेखक पु.ल. देशपांडे यांच्या काळात असत्या, तर ‘व्यक्ती आणि वल्ली’मध्ये एक पात्र आणखी वाढले असते.’’ (‘व्यक्ती आणि वल्ली’ हे पु.ल. देशपांडे यांच्या काल्पनिक व्यक्तीरेखांच्या संग्रहाचे नाव आहे.’ – संकलक) याविषयी आम्ही ताईंना सांगितल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘पु.ल. देशपांडे यांच्याविषयी मला माहिती नाही; पण परात्पर गुरु डॉक्टरांनी मला इतक्या प्रसंगांत सांभाळले आहे की, मला त्यांची वल्ली (विलक्षण व्यक्ती) व्हायला आवडेल !’’
३ आ. पूल बांधण्याच्या संदर्भातील शासकीय कामांसाठी जातांना ताईंनी प्रार्थना करणे आणि त्यातून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीरामाचे अवतार आहेत’, असा त्यांचा भाव असल्याचे लक्षात येणे : देवद आश्रमाच्या जवळून जाणारा आणि देवद गावातून पनवेल शहरात जाण्यासाठी आवश्यक असलेला एक पूल (ब्रिज) गाढी नदीवर बांधायचा होता. (देवद आश्रमासमोरच गाढी नदी आहे.) ‘त्याविषयी निवेदन देणे आणि अन्य काही कागदपत्रांची पूर्तता करणे’, या सेवांसाठी मी ताईंच्या समवेत शासकीय कार्यालयात जात होतो. गाडीत बसल्यावर सेवेनुरूप प्रार्थना करायचे ठरले. त्या वेळी ताई म्हणाल्या, ‘‘मी प्रार्थना सांगते. आश्रम आणि गाव यांच्या दृष्टीने वाहनांच्या सोयीसाठी पूल होणे आवश्यक आहे. हा पूल म्हणजे एक सेतू आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले हे प्रत्यक्ष श्रीरामाचे अवतार आहेत. त्यामुळे सेवेसाठी जाणारे आपण साधक, म्हणजे त्यांची वानरसेना आहोत.’’ अशा स्वरूपाची प्रार्थना त्यांनी केली. प्रार्थनेत त्यांचा परात्पर गुरुदेवांप्रती असलेला भाव जाणवत होता. ‘वानरसेना जशी युद्धाला जाण्यासाठी सिद्ध होती, त्याच पद्धतीने ताईही या सेवेसाठी सिद्ध आहेत’, अशी तळमळ त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती.
३ इ. ग्रामपंचायतीच्या कार्यालयात नवीन घंटागाडीचे उद्घाटन झाल्यावर ताईंनी एकटीनेच ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’, ही घोषणा देणे आणि त्याविषयी विचारल्यावर त्यांनी गुरूंचे आज्ञापालन करत असल्याचे ठामपणे सांगणे : काही वर्षांपूर्वी मी आणि एक साधिका देवद ग्रामपंचायतीत सदस्य पदावर होतो. ग्रामपंचायतीच्या वतीने गावात घंटागाडी चालू करायचे ठरल्यावर नवीन गाडी घेण्यात आली. शक्यतो या गाडीचे पूजन सरपंच करतात; परंतु काही कारणास्तव सरपंचांना पूजन करणे शक्य होणार नव्हते. तेव्हा त्यांनी मला आणि माझ्या समवेत सदस्य पदावर असणाऱ्या साधिकेला पूजन करायला सांगितले. त्याच वेळी ताई काही कामानिमित्त ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आल्या होत्या. पूजन झाल्यावर त्यांनी एकटीनेच ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् । (म्हणजे हिंदु राष्ट्राचा विजय असो !)’, अशी घोषणा दिली. तेव्हा त्यांच्या मनात ‘समाजातील इतर व्यक्तींसमोर अशी घोषणा कशी द्यायची ?’, असा कोणताही विचार आला नाही. त्या कालावधीत ही घोषणा नवीनच असल्याने ताईंना घोषणेचा अर्थ ठाऊक नव्हता. गावातील एकाने घोषणेच्या अर्थाविषयी ताईंना विचारल्यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितले, ‘‘आमच्या गुरुदेवांनी ही घोषणा देण्यास सांगितली आहे. त्यामुळे हे हिंदूंच्या चांगल्यासाठीच आहे.’’ (त्यानंतर मी घोषणेचा अर्थ उपस्थितांना समजावून सांगितला.)
३ ई. ‘प्रथम देवद (पनवेल) आणि नंतर रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमांच्या शेजारी घर असावे’, ही ताईंची इच्छा पूर्ण होणे अन् ‘देवच माझे सगळे हट्ट पुरवतो’, असे त्यांनी भावपूर्णरित्या सांगणे : काही कारणांमुळे ताईंना सनातनच्या आश्रमात रहाणे शक्य होत नव्हते. त्यामुळे त्यांना ‘पनवेल येथील आश्रमाच्या जवळ आपले घर असावे’, असे नेहमी वाटायचे. त्या वेळी देवद येथे आश्रमाच्या जवळच त्यांनी स्वतःचे घर बांधले; परंतु काही कालावधीनंतर त्यांना सेवेसाठी गोवा येथे जावे लागणार होते. तेव्हाही त्यांना वाटत होते, ‘मला आश्रमाच्या जवळ घर मिळावे; म्हणजे घरी असले, तरी मला आश्रमाचे चैतन्य मिळेल.’ ताईंची इतकी तळमळ होती की, ताईंना रामनाथी आश्रमाच्या अगदी जवळ घर मिळाले ! त्यांनी मला याविषयी संपर्क करून सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘मी काहीच करत नसून देवच माझे सगळे हट्ट पुरवतो.’’ हे सांगतांना त्यांचा देवाप्रती अपार भाव असल्याचे जाणवत होते.
३ उ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील अपार श्रद्धेमुळे निर्भय असणे : देवद आश्रमाच्या जवळ घर असल्याने ताई पहाटे लवकर आश्रमात येऊन नामजपादी उपाय करायच्या. गोवा येथे रस्त्यावर शांतता असते. तेव्हाही ताई पहाटे ५ वाजता एकट्याच चालत आश्रमात यायच्या आणि ध्यानमंदिरात बसून नामजप करायच्या. तेव्हा एका साधकाने त्यांना विचारले, ‘‘इतक्या पहाटे एकटीने यायला तुम्हाला भीती वाटत नाही का ?’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘आपण गुरुदेवांचे साधक आहोत, तर कशाला घाबरायचे ?’’
३ ऊ. पै. ताईंनी स्वतःच्या आस्थापनातील संचालकपदी अन्य कुणाला नियुक्त न करता साधकांना नियुक्त करणे आणि ‘साधकांच्या रूपात परात्पर गुरु डॉक्टर समवेत आहेत’, अशी त्यांची श्रद्धा असणे : ताईंनी त्यांच्या एका वैयक्तिक कामासाठी आस्थापन (कंपनी) बनवले. ‘त्यात २ संचालक (डायरेक्टर्स) असावेत’, अशी अट असते. तेव्हा ताई म्हणाल्या, ‘‘मी साधकांनाच या पदावर नियुक्त करीन. परात्पर गुरु डॉक्टरच त्या साधकांच्या रूपात माझ्या समवेत असतील.’’ त्यांनी अन्य कुणालाही या आस्थापनातील पदावर नियुक्त न करता साधकांना प्राधान्य दिले.
३ ए. पै. ताईंनी ‘आचार्य अत्रे यांची नातसून’ या ओळखीचा वापर कामे करून घेण्यासाठी कधीही न करणे आणि त्यांनी बांधकामाच्या क्षेत्रात टिकून असल्याचे श्रेय परात्पर गुरु डॉक्टरांना देणे : व्यवसायाच्या निमित्ताने ताईंचा बाहेरील अनेक व्यक्तींशी संपर्क येतो. त्या स्वतः आचार्य अत्रे यांच्या नातसून आहेत (‘आचार्य प्र.के. अत्रे यांची मुलगी शिरीष पै यांच्या त्या सूनबाई आहेत.’ – संकलक); मात्र ताई याचा कधीही आणि कुठेही उल्लेख करत नाहीत. ‘मी बांधकाम व्यावसायिक आहे आणि देवाच्या कृपेने मी काही इमारती बांधल्या आहेत’, असे त्या सांगतात. ‘इतरांची नावे सांगून कामे कशाला करून घ्यायची ?’, असे त्यांना वाटते आणि ‘खरेतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळेच मी या क्षेत्रात टिकून आहे’, असे त्या म्हणतात.
३ ऐ. ताईंनी बांधकामाच्या क्षेत्रातील सर्व कामे एकटीने उत्साहाने पूर्ण करणे आणि त्यांनी ‘गुरुदेव मला शक्ती देतात’, असे सांगितल्यावर बांधकाम व्यावसायिकांनीही नकळत हात जोडणे : ताईंचे वय ६७ वर्षे आहे; परंतु त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल, असा आहे. बांधकामाच्या क्षेत्रात ‘कामगारांकडून कामे करवून घेणे, स्लॅबवर जाऊन स्वतः कामे पहाणे, आराखडा (‘प्लान’) अंतिम करण्यासाठी सरकारी कार्यालयात जाणे’ इत्यादी कठीण कामेही ताई एकट्याच पूर्ण करतात. पनवेल शहरातील काही तरुण बांधकाम व्यावसायिक ताईंना म्हणतात, ‘‘ताई, या वयात तुम्ही हे सर्व कसे करता ?’’ तेव्हा ताई प्रत्येक वेळी सांगतात, ‘‘गुरुदेव मला शक्ती देतात.’’ हे वाक्य सांगतांना ताईंची परात्पर गुरु डॉक्टरांवरील श्रद्धा प्रतीत होते. त्यामुळे काही बांधकाम व्यावसायिकही नकळत हात जोडतात. हे मी स्वतः
पाहिले आहे.
४. श्रीमती शशिकला पै यांच्यात जाणवलेले पालट
४ अ. आग्रहीपणा न्यून होणे : पूर्वी त्या कोणत्याही प्रसंगात पुष्कळ आग्रही असायच्या. त्या ‘स्वतःच्या मनात येईल, तसे लगेच झाले पाहिजे’, अशा मताच्या होत्या; परंतु गेल्या ३ – ४ वर्षांत त्यांनी स्वतःमध्ये पुष्कळ पालट केला आहे. आता त्या कोणतेही सूत्र शांतपणे सांगतात. कोणतीही गोष्ट थेट न मागता ‘हे मिळू शकते का ?’ किंवा ‘तुम्हाला कुणाला काही अडचणी येणार नाहीत ना ?’, असे विचारतात. एखाद्या वेळी त्यांनी आग्रही भूमिकेने काही मागितले, तरी त्या नंतर क्षमायाचनाही करतात.
४ आ. व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणे : त्या ‘नामजपादी उपाय करणे, स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनच्या प्रक्रियेअंतर्गत सारणी लिखाण करणे’, असे प्रयत्न सातत्याने करत आहेत. काही वेळा प्रयत्नांमध्ये खंड पडला, तरीही त्या पुन्हा प्रयत्न चालू करतात.
४ इ. दूरभाषवर कुणाशीही बोलतांना ‘दादा’, ‘ताई’, ‘धन्यवाद’, ‘कृतज्ञ आहे’, असे आदराने संबोधतात.
४ ई. स्वतःच्या चुका स्वीकारण्याचा प्रयत्न करणे : ताईंकडून एका सेवेत काही चुका झाल्याने एका संतांनी त्यांना त्यांच्या स्वभावदोषांची जाणीव करून दिली होती. पूर्वी असे झाल्यास ताईंना पुष्कळ राग येत असे; पण आता त्या चुका स्वीकारतात. काही वेळा चूक स्वीकारायला जमली नाही, तरीही त्या स्थिर रहाण्याचा प्रयत्न करतात. ‘परात्पर गुरुदेवांना माझे अहं-निर्मूलन करायचे आहे’, असे त्या म्हणतात.
‘श्रीमती पैताई यांच्या माध्यमातून देव मला साधनेच्या संदर्भातील वेगवेगळे पैलू शिकवत आहे’, याबद्दल परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
– श्री. निनाद गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.७.२०२१)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |