सध्या उन्हाळा चालू झाला आहे. या काळात शरिराचे तापमान वाढणे, घाम येणे, शक्ती न्यून होणे आदी त्रास होतात. तापमान वाढल्याने व्यक्ती बेशुद्ध पडून (उष्माघात होऊन) दगावल्याचीही काही उदाहरणे आहेत. उन्हाळ्यात होणार्या विविध विकारांपासून दूर रहाण्यासाठी सर्वांनी पुढील काळजी घेणे आवश्यक आहे.
१. दिवसभरात आवश्यक तेवढे पाणी अथवा तत्सम पेय प्यावे. पाणी पिण्यासाठी तहान लागण्याची वाट पाहू नये. गडद रंगाची लघवी होत असल्यास ‘अधिक पाणी प्यायला हवे’, हे लक्षात घ्यावे. शीतकपाटातील पाणी पिणे टाळावे. सकाळी घराबाहेर पडण्यापूर्वी एक पेला पाणी पिऊन निघावे. बाहेर जातांना समवेत स्वतःची पाण्याची बाटली ठेवू शकतो.
२. पाणी एका वेळी गटागट भरपूर न पिता सावकाश प्यावे. उन्हातून आल्यावर लगेच पाणी न पिता ५ ते १० मिनिटे शांत बसून मग पाणी प्यावे.
३. साखर असलेले पेय पिऊ शकतो; पण अधिक साखर असलेले पेय पचायला जड असल्याने शक्यतो ते पिऊ नये. शक्य असल्यास प्रतिदिनच्या आहारात ताक किंवा पन्हे यांचा समावेश असावा.
४. बाहेरील खाद्यपदार्थांचे सेवन करणे टाळावे.
५. सैलसर, फिकट रंगाची आणि वजनाला हलकी असणारी (शक्य असल्यास सुती) वस्त्रे वापरावीत.
६. या दिवसांत अधिक घाम येत असल्याने थकवाही लवकर येतो. त्यामुळे व्यायामाचे प्रमाण अल्प ठेवावे.
७. ऊन असतांना घरात किंवा सावली असलेल्या ठिकाणी थांबावे.
८. वातावरणात थंडावा रहाण्यासाठी कूलरची (वायूशीतलीकरण यंत्राची) सुविधा असेल, तर दिवसातील काही घंटे त्याचा वापर करावा.
९. शक्यतो सकाळी १० पूर्वी आणि दुपारी ४ वाजल्यानंतर घरातून बाहेर पडावे. ‘उन्हाची झळ लागू नये’, यासाठी बाहेर जातांना डोळ्यांना ‘गॉगल’ लावावा. छत्री अथवा डोक्यावर सर्व बाजूंनी सावली येईल, अशा प्रकारची टोपी (‘हॅट’) वापरावी. टोपी उपलब्ध नसल्यास डोक्याला आणि कानाला मोठा पांढरा रूमाल बांधावा.
१०. काहींना अध्यात्मप्रसाराची सेवा किंवा अन्य कारणांमुळे बाहेर जावे लागते वा प्रवास करावा लागतो. ‘उष्णतेचा त्रास होऊ नये’, यासाठी पुरुषांनी खिशात आणि स्त्रियांनी त्यांच्या पर्समध्ये कांदा ठेवावा. कांदा शरिरातील उष्णता खेचून घेत असल्याने ३ – ४ दिवसांनी तो कोरडा पडतो. कोरडा पडलेला कांदा टाकून देऊन नवीन कांदा समवेत ठेवावा.
११. जागरण केल्याने शरिरात पित्त आणि वात हे दोष वाढतात. त्यामुळे अती जागरण टाळावे. (ही काळजी सर्व ऋतूंत घेणे आवश्यक आहे.)
१ वर्षापेक्षा लहान वयाच्या बाळांची, तसेच ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींची वरील सूत्रांच्या आधारे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
– वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.३.२०२२)