हिंदु धर्मातील सर्व घटक एकत्र बांधून ठेवण्यासाठी कोणती उपाययोजना करता येईल ?

प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !

याविषयी नेमकेपणाने सांगायचे, तर समाजातील विविध घटक जे विभिन्न स्वभाव- प्रकृती-क्षमता यानुरूप असतात, त्यांना सुसंवादी पद्धतीने आणि परस्परांमध्ये संघर्ष होऊ न देता एकत्र नांदवण्यासाठी हिंदु धर्माची व्यवस्था निर्माण झाली.

प.पू. स्वामी वरदानंद भारती

१. धर्माच्या मुख्य तत्त्वांकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम

आज असे दिसते की, हिंदु धर्मातील विभिन्न घटकांतील सुसंवाद संपून त्यांच्यात संघर्ष होत आहे. उदाहरणार्थ विविध उपासना संप्रदायांचे आपापले सांप्रदायिक आग्रह त्यांच्यापुरते मर्यादित न ठेवता अन्यांशी संघर्ष करत आहेत. एकीकडे प्रामाणिक धार्मिकता न्यून होत चाललेली, तर दुसरीकडे धार्मिक उन्माद वाढत चालल्याचे दिसते. या परिस्थितीकडे शांतपणे, साक्षीभावाने पाहून स्थिर बुद्धीने चिंतन केले, तर एक गोष्ट लक्षात येऊ शकेल की, हे सर्व संघर्ष मोठेपणाच्या कल्पनेने किंवा काही स्वार्थाच्या लालसेने होत आहेत. प्रत्येक घटक फुटीर वेगळा होऊ पहातो आहे. त्यामागे काही अल्पकालीन स्वार्थ दिसतात. हा परिणाम राजकीय धोरणांचा अनुनय आहे. प्रत्येक घटक स्वतःच्या संकुचित आणि तात्पुरत्या एक प्रकारच्या स्वार्थी वृत्तीने अंध झाल्यासारखे वागतो. समष्टी किंवा राष्ट्रजीवन यांचा विचार कुणी करतांना दिसत नाही. धर्माच्या मुख्य तत्त्वांकडे दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम आहे.

२. हिंदु धर्माची पुनर्स्थापना हीच एकमेव उपाययोजना !

या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी धर्माचे स्वरूप (मुख्य तत्त्वे) समजून घ्यावे लागेल. समाजाची काही संरचना स्वीकारली पाहिजे. आपल्याकडे पूर्वी वर्ण आणि आश्रम अशी विभागशः संरचना केली होती. आज ती तशी स्वीकारायची नाही, असे ठरले, तरी काही ना काही विभागणी करावी लागेल. या प्रत्येक घटकाचे जसे विशेष अधिकार असतील त्यासह उत्तरदायित्व आणि कर्तव्येही असतील, हे आग्रहाने स्पष्ट केले पाहिजे. एक प्रकारे हिंदु धर्माची सुयोग्य पुनर्स्थापना हीच उपाययोजना करावी लागेल.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती (वर्ष १९९८)

(साभार : ग्रंथ ‘जिज्ञासा’, श्रीवरदानंद प्रतिष्ठान, श्री क्षेत्र पंढरपूर)