नाशिक येथील मराठी साहित्य संमेलन पंचतारांकित करण्याच्या नादात महामंडळाच्या धोरणाचा बळी दिला !

मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांचा आरोप

प्रा. कौतिकराव ठाले-पाटील

नाशिक – नाशिकचे ९४ वे मराठी साहित्य संमेलन एकट्या छगन भुजबळांचे झाले. साहित्य संमेलन पंचतारांकित करण्याच्या नादात महामंडळाच्या धोरणाचा बळी दिला, असा आरोप अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी केला आहे. त्यांनी महामंडळाच्या अक्षरयात्रा या नियतकालिकातील अध्यक्षीय मनोगतामध्ये हा आरोप केला आहे.

ठाले-पाटील लेखात म्हणाले की…

१. धाराशिवमध्ये झालेल्या साहित्य संमेलनाच्या वेळी ‘पुढील संमेलन आम्ही नाशिकला घेऊ’, असा शब्द दिला. त्या वेळी संमेलन धाराशिवप्रमाणे ‘साधे आणि लोकांचे व्हावे’, अशी अट घातली. नाशिकच्या संमेलनकर्त्यांनी तसा शब्द दिला; मात्र ते शब्दांना जागणारे निघाले नाहीत. त्यांच्यातील काही जण पक्के व्यावसायिक, हिशेबी, भपक्याच्या मोहात पडले. त्यांनी लोकांना दूर लोटले. पंचतारांकित साहित्य संमेलनाच्या नादात साहित्य महामंडळाचा हेतू आणि धोरणाचा बळी दिला.

२. स्वागताध्यक्षापुरती केवळ एका नेत्याची परवानगी द्या, दुसर्‍या कोणत्याही नेत्याला व्यासपिठाचा वापर करू देणार नाही, असे आश्वासन लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी दिले; मात्र त्यांनी आमची फसवणूक केली. हे समजले तेव्हा विलंब झाला होता.

३. नाशिकने संमेलनासाठी निधी उभारण्याचे नवे तंत्र शोधले आहे. एखाद्या मंत्र्याला किंवा वजनदार नेत्याला स्वागताध्यक्षपद दिले की, साहित्य संमेलनामध्येच राजकीय संमेलन साजरे झालेच म्हणून समजा. परिसरातील १० ते २० आमदार आणि १ किंवा २ खासदार यांची संमतीपत्रे घेऊन त्यांच्या निधीतून दीड-दोन कोटी विनासायास मिळतात. ते पैसे सरकारी तिजोरीतून, सरकारच्या अनुमतीने संमेलनाच्या खात्यात जमा होतात;  मात्र भविष्यात साहित्य संमेलन लोकांचे होण्याऐवजी सरकारचे होईल. हा साहित्य संस्था आणि वाङ्मयीन जगताला मोठा धोका आहे.