आम्ही नाही, तर ‘नाटो’ आणि युक्रेन यांनी अणूयुद्धाची गोष्ट केली ! – रशियाची कोलांटीउडी

रशियाचे परराष्ट्रमंत्री लावरोेव्ह

मॉस्को (रशिया) – आम्ही अणू युद्धाची गोष्ट केलेली नाही, तर युक्रेन आणि ‘नाटो’ (नॉर्थ अ‍ॅटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) यांच्याकडून ती करण्यात आली, असे रशियाचे परराष्ट्रमंत्री लावरोेव्ह यांनी सांगितले. ‘जोपर्यंत युद्धाचा आमचा उद्देश पूर्ण होत नाही, तोपर्यंत युद्ध चालूच राहील’, अस सांगतांनाच लावरोेव्ह यांनी ‘युक्रेनशी कोणत्याही अटीविना चर्चा करण्यास रशिया सिद्ध आहे’, असेही म्हटले आहे.

लावरोेव्ह यांनी युक्रेनवर आरोप केला की, युक्रेन त्याच्या नागरिकांना आणि विदेशी नागरिकांना ढाल बनवत आहे. त्यांना देशातून बाहेर पडण्यापासून रोखत आहे.

रशियाच्या मेजर जनरलचा मृत्यू

युक्रेनमध्ये रशियाचे मेजर जनरल आंद्रेई सुखोतवत्स्की यांचा मृत्यू झाल्याची माहिती युक्रेनकडून देण्यात आली आहे.

रशियाकडून याला अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही.

रशियाचे सैन्य अद्यापही कीवपासून ३० किमी अंतरावर !

दुसरीकडे रशियाचे सैन्य अजूनही युक्रेनची राजधानी कीवपासून ३० किमी अंतर दूर आहे, अशी माहिती ब्रिटनच्या संरक्षण यंत्रणेकडून देण्यात आली. युक्रेन सैन्याच्या प्रखर विरोधामुळे गेल्या ४ दिवसांत रशियाच्या सैन्याला कीवमध्ये घुसता आलेले नाही. ‘रशियाची ४ लढाऊ विमाने बाल्टिक सागरावरून स्विडनच्या आकाश मार्गात घुसली आहेत’, असा दावा स्विडनने केला आहे.