अन्न वाया घालवणार्‍यांना आकारण्यात आलेला दंड आणि त्यांचे केलेले प्रबोधन यांमुळे साहित्य संमेलनात मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी टळली !

९४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन

  • अन्न टाकून देणार्‍यांना २०० रुपये दंड, तर अन्न टाकून देत असल्याचे दाखवून देणार्‍यांना १०० रुपये बक्षीस !  

  • आयोजकांकडून शिस्त लावण्याचा प्रयत्न !

  • अन्नाची नासाडी टाळण्यासाठी आयोजकांनी केलेले नियोजन कौतुकास्पद आणि अनुकरणीय ! – संपादक 
  • सार्वजनिक सभारंभ आणि कार्यक्रम यांत या कृतींचे अनुकरण करून अन्नाची नासाडी टाळण्यासाठी सर्व सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा ! – संपादक 

नाशिक, ६ डिसेंबर (वार्ता.) – साहित्यिकांतील वाद आणि मतांतरे यांमुळे नाशिक येथे पार पडलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वादग्रस्त ठरले, तरी या संमेलनातील भोजनव्यवस्था मात्र सर्वांसाठीच लक्षवेधी ठरली. अन्न वाया घालवणार्‍यांसाठी आयोजकांनी २०० रुपये दंड आकारला. त्यामुळे ‘फुकट आहे म्हणून अधिक अन्न वाढून घेणारे आणि संपले नाही म्हणून ते टाकून देऊन वाया घालवणारे’ यांना आयोजकांच्या कृतीमुळे शिस्त लागली. अखिल भारतीय साहित्य संमेलनात, तसेच सार्वजनिक कार्यक्रमात अशी शिस्त प्रथमच पहायला मिळाली ! आयोजकांच्या या शिस्तीमुळे या संमेलनामध्ये जेवणाची मोठ्या प्रमाणात होणारी नासाडी टळली आणि सर्वांना एक चांगली शिस्त लागली. आयोजकांची ही कृती यापुढे साहित्य संमेलनासह सर्वच विवाह, अन्य समारंभ आदी सर्वच कार्यक्रमांसाठी अनुकरणीय आहे.

या संमेलनाच्या व्यवस्थापनातील विविध समित्यांच्या अंतर्गत ‘भोजन, अल्पोपहार समिती’ होती. या समितीमध्ये नाशिक येथील प्रतिष्ठित मान्यवरांचा सहभाग होता. ‘अन्नाचा एकही कण वाया जाणार नाही’, असे धोरण ठरवून या समितीने भोजनव्यवस्थेचे नियोजन केले. या सर्व समितीच्या अंतर्गत नाशिकमधील विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले. ‘भुजबळ नॉलेज सिटी’ने यामध्ये पुढाकार घेऊन या वेगवेगळ्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी ४-५ दिवस अभ्यासवर्ग घेऊन व्यवस्थापनातील बारकावे सांगितले. स्वयंसेवक विद्यार्थी आणि भोजन, अल्पोपहार समिती यांच्या वतीने याचे चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आले. ‘श्री इच्छामणी केटरिंग सर्व्हिसेस’ यांच्याकडून भोजन सिद्ध करण्यात आले होते. उमेश मुंदडा यांनी भोजन आणि अल्पोपहार समितीचे प्रमुख म्हणून काम पाहिले.

अन्नाची नासाडी करणार्‍यांना आयोजकांनी शिस्त लावली !

संमेलनाच्या पहिल्या दिवशी भोजनासाठी आलेले अनेक जण स्वत:ला किती लागणार आहे ? तेवढेच आवश्यक अन्न न घेता अधिक अन्न घेत होते आणि ते शेष राहिल्यावर टाकून द्यायला जात होते. या ठिकाणी भोजन समितीमधील पदाधिकारी आणि स्वयंसेवक ताटातील अन्न पूर्ण संपल्यानंतरच ताट जमा करण्यास सांगत होते. या वेळी काही जण ‘संपवता येणार नाही’, म्हणून विनवणी करत होते. त्या वेळी आयोजक आणि स्वयंसेवक त्यांना आवश्यक तेवढेच अन्न घेण्याविषयी संयमाने सांगत होते. तरीही जे अन्न टाकून देत होते, त्यांच्याकडून दंड घेण्यात आला.

भोजन टाकणार्‍यांना २०० रुपये दंड आणि दाखवून देणार्‍यांना १०० रुपये बक्षीस !

अन्न टाकून देणार्‍यांचे छायाचित्र काढून त्यांना २०० रुपये दंड आकारण्यात येत होता, तसेच कुणी अन्न टाकत असेल, तर ते दाखवून देणार्‍यांना १०० रुपये बक्षीसही देण्याची घोषणा आयोजकांकडून करण्यात आली. जेवण चालू असतांना ही उद्घोषणा करण्यात येत होती.

पोलिसांनाही नम्रपणे आणि धीटाईने सांगणारे विद्यार्थी !

या समितीमध्ये भुजबळ नॉलेज सिटीमधील विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम करत होते. जेवण झाल्यानंतर जे ताट देण्यासाठी जात होते, त्यामध्ये कुणी अन्न टाकत असेल, तर त्यांना हे विद्यार्थी धीट आणि नम्रपणे अन्न न टाकण्याविषयी सांगत होते. या वेळी एक पोलीस महिला अधिकारी विद्यार्थ्यांशी वाद घालायला लागली. त्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्याने त्यांना नम्रपणे ताटातील अन्न टाकून न देण्याविषयी सांगितले.

आवश्यक तेवढेच वाढण्याची पद्धत !

श्री इच्छामणी केटरिंग सर्व्हिसेसचे कर्मचारी भोजन वाढत होते. भोजन वाढत असतांना ते आवश्यक तेवढेच वाढत होते.

शिस्तीमुळे पुढील २ दिवसांत अन्नाची नासाडी टळली !

पहिल्या दिवशी अनेक जण ताटात अधिक वाढून घेत होते; मात्र पहिल्या दिवसापासून अन्न टाकून देणार्‍यांना दंड लावणे, प्रबोधन करणे आदींमुळे संमेलनाच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशी अन्नाची नासाडी टाळता आली.

अन्नाची नासाडी ९९ टक्के टाळता आली ! – सुनील चोपडा, समिती उपप्रमुख, भोजन, अल्पोपहार समिती

श्री. सुनील चोपडा

‘या संमेलनात नियमित सरासरी ५ सहस्र ५०० जणांनी भोजन केले. अन्न टाकणार्‍यांकडून दंड वसूल करणे, हा आमचा हेतू नव्हता, तर त्यांना अन्नाचे महत्त्व लक्षात यावे आणि कुणी अन्न वाया घालवू नये, यासाठी आम्ही हा नियम केला. देशातील १० टक्के नागरिकांना गरिबीमुळे उपाशी झोपावे लागते, दुसरीकडे आपण मात्र अन्न वाया घालवतो, हे योग्य नाही. या साहित्य संमेलनासाठी कितीतरी देणगीदारांनी पैसे दिले आहेत. घेतलेले अन्न टाकून देणे म्हणजे त्यांनी दिलेल्या पैशाचा दुरुपयोग केल्यासारखे होईल. अशा प्रकारे केलेल्या नियमामुळे इतरत्र होत असलेल्या अन्नाच्या नासाडीच्या तुलनेत ९९ टक्के अन्नाची नासाडी ठाळता आली. येथे भोजनासाठी येणारे हे सर्व आमचे अतिथी आहेत, अशा प्रकारे त्यांची व्यवस्था करण्याचा आम्ही प्रयत्न केला’, असे सुनील चोपडा यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले. सुनील चोपडा हे स्वत: एक प्रतिष्ठित व्यावसायिक असून नाशिक येथील विविध सामाजिक संघटनांचे ते प्रमुख आणि पदाधिकारीही आहेत. असे असतांना स्वत: उभे राहून ते ‘कुणी अन्न टाकू नये’, यासाठी सर्वांना विनंती करत होते.

भोजनाच्या ठिकाणी लावलेले होते पुढील मनोरंजन करणार्‍या वाक्यांचे फलक !

१. मी जिभेचे चोचले पुरवत नाही, फक्त पोटाचे पुरवतो !

२. लोकांना जेवायला बोलावल्यानंतर ‘चला, वाढायला घ्या’ या वाक्याइतके उत्साहवर्धक वाक्य नाही. – पु.ल. देशपांडे

वाया गेलेल्या अन्नातून किती जण जेवू शकतील ? याचा फलकावर लेखाजोखा  !

भुजबळ नॉलेज सिटीमधील ‘कॅन्टीन’मध्ये ‘काऊंटर’वर आदल्या दिवशी किती अन्न वाया गेले ? त्यातून किती जण जेवू शकले असते ? याची माहिती तेथे फलकावर लावण्यात येते. यामुळे तेथे येणार्‍यांना अन्नाची नासाडी करू नये, असा संदेश जातो, अशी माहिती तेथील एका प्राध्यापकांनी दिली.

श्री. सतीश महाजन (फोटोवर क्लिक करा)

वैशिष्ट्यपूर्ण

अन्नाची नासाडी टाळण्यासाठी गळ्यात पाटी घालून प्रबोधन करणारे सतीश महाजन !

अन्नाची नासाडी होऊ नये, यासाठी सतीश महाजन हे गृहस्थ याविषयीचा संदेश असलेली पाटी गळ्यात अडकवून भोजनस्थळी उपस्थित होते. त्यांच्या गळ्यातील पाटीवर ‘आपल्याला पाहिजे तेवढेच अन्न ताटात घ्या, अन्नाची नासाडी टाळा’, असा संदेश लिहिला होता. सतीश महाजन हे वाहतूक पोलीस शाखेत काम करत असून अन्न आणि अल्पोपहार समितीमध्ये ते सदस्यही होते. (गरिबीमुळे देशातील अनेक नागरिकांना उपाशी किंवा अर्धपोटी रहावे लागते; मात्र याची काडीमात्र जाणीव न ठेवता अनेक कार्यक्रमांतून अन्न वाया घालवले जाते. श्री. सतीश महाजन करत असलेला प्रयत्न अभिनंदनीय आणि अनुकरणीय आहे. त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यायला हवा ! – संपादक)