खगोलशास्त्र आणि फलज्योतिष यांच्यातील भेद सुशिक्षितांना कळत नाही ! – डॉ. जयंत नारळीकर, अध्यक्ष, अखिल भारतीय साहित्य संमेलन

नाशिक – खगोलशास्त्र आणि फलज्योतिष यांच्यातील मुख्य भेद अजूनही तथाकथित सुशिक्षितांना कळत नाही, हे पाहून मन खिन्न होते. ‘तुम्ही फलज्योतिषाला विज्ञान म्हणत नाही, याचे कारण तुमची मनोवृत्ती पूर्वग्रहदूषित आहे’, असा आरोप माझ्यावर झाल्यानंतर हसावे कि रडावे, हे कळत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ वैज्ञानिक आणि ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी केले. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ या वेळी संमेलनस्थळी दाखवण्यात आला.

डॉ. नारळीकर या वेळी म्हणाले की, एखादा वैज्ञानिक शोध जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी लिहिलेले लेख खर्‍या अर्थाने ‘विज्ञान साहित्य’ होऊ शकते. भविष्यातील चित्रे रेखाटतांना विज्ञानकथाकार समाजाला काही वैज्ञानिक संशोधनातून उद्भवणार्‍या धोक्यांपासून सावध करू शकतो. मराठी साहित्यामध्ये विज्ञान साहित्य अल्प प्रमाणात आहे. विज्ञान लेखक केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतके आहेत. प्रतिष्ठित साहित्यिकांमध्ये विज्ञानाविषयी एकप्रकारची भीती दिसून येते. विज्ञान म्हणजे आपल्या आकलनापलीकडील आहे, असा अनेक साहित्यिकांचा ग्रह झालेला असल्याने ते स्वत:ची प्रतिभा विज्ञानाच्या दिशेने चालवण्यास धजत नाहीत.

(म्हणे) ‘परकीय शब्दांनी भाषा विकसित होते !’ – डॉ. नारळीकर

काही इंग्रजी शब्द मराठी भाषेत रूढ झाले आहेत. विज्ञानाची भाषा इंग्रजी असल्यामुळे माझ्या कथेत इंग्रजी शब्द येतात. जर लोक ते स्वीकारत असतील, तर त्याला कृत्रिम मराठी पर्यायी शब्द का वापरावेत ? इतर भाषांतील शब्द आपल्या भाषेत आल्यामुळे भाषा विकसित होते, समृद्ध होते. आज शुद्ध समजले जाणारे शब्द कधी काळी बाहेरूनच आलेले आहेत, असेही डॉ. नारळीकर या वेळी म्हणाले. (परकीय शब्दांच्या घुसखोरीने भाषा समृद्ध होते, असे नव्हे, तर भाषेतील परकीय शब्द वाढतात. मराठी भाषा ही अन्य भाषांच्या तुलनेत अधिक सात्त्विक आहे. त्यात परकीय शब्दांचा अधिकाधिक वापर झाल्याने तिची सात्त्विकता न्यून होऊ शकते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अनेक चपखल असे मराठी प्रतिशब्द शोधून मराठीला खर्‍या अर्थाने समृद्ध केले. भाषेत कृत्रिम आणि अवघड शब्द नको, हे योग्य आहे; परंतु त्यासाठी परकीय शब्दांचा भडीमार असणेही योग्य नव्हे. ‘इंग्रजी शब्द वापरले तरी चालतात’ या दृष्टीकोनामुळे सध्या काही ठिकाणी ‘इंग्रजीमिश्रित मराठी’ बोलली जात आहे. – संपादक)