पणजी – अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एन्.सी.बी.) ‘बॉलीवूड’चे (हिंदी चित्रपटसृष्टीला ‘बॉलीवूड’ म्हणतात.) अर्जुन रामपाल यांची दक्षिण आफ्रिका येथील प्रेयसी गाब्रियाला डिमीट्रायडेस हिचा भाऊ ॲजिसिलाओस डिमीट्रायडेस याला अमली पदार्थ प्रकरणात कह्यात घेतले आहे. ‘एन्.सी.बी.’ मुंबई आणि गोवा यांनी संयुक्तरित्या मोरजी अन् हणजूण येथे कारवाई करून समवेत ३० ग्रॅम चरस बाळगल्याच्या प्रकरणी ॲजिसिलाओस याला कह्यात घेतले.
‘एन्.सी.बी.’चे विभागीय संचालक समीर वानखेडे म्हणाले, ‘‘ॲजिसिलाओस याच्या विरोधात ‘एन्.सी.बी.’ची ही तिसरी कारवाई आहे. ॲजिसिलाओस याला पहिल्यांदा सुशांत सिंह राजपूत अमली पदार्थ प्रकरणात ऑक्टोबर २०२० मध्ये कह्यात घेण्यात आले होते, तर दुसर्यांदा नायजेरियन कोकेन प्रकरणात कह्यात घेण्यात आले होते. या दोन्ही प्रकरणांमध्ये त्याची जामिनावर सुटका झाली होती. (अशा प्रकारे अमली पदार्थ प्रकरणातील गुन्हेगार जामिनावर सुटून पुन्हा तोच गुन्हा करत असल्याने याविषयीच्या कायदाच कठोर करायला हवा ! हे शासनाला का कळत नाही ? – संपादक) या प्रकरणी मुंबईस्थित मयूर मोहनानी, छत्तीसगड येथील नॉरमन सवेरी, भाग्यनगर येथील सिद्धीक अहमद यांनाही अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणी कह्यात घेण्यात आले आहे.’’