पुणे येथे रेल्वेच्या अवैध तिकिटविक्रीसाठी वापरल्या जाणार्‍या प्रणालीचे मूळ पाकिस्तानात

अवैध तिकिटविक्री करणार्‍यांवर लक्ष ठेवून आहोत ! – रेल्वे सुरक्षा बल

पुणे – रेल्वेच्या अवैध तिकिटविक्रीसाठी वापरले जाणार्‍या प्रणालीचे मूळ पाकिस्तानात असल्याचे ‘रेल्वे सुरक्षा बल’ या रेल्वेच्या सुरक्षायंत्रणेने सांगितले आहे. अशा प्रकारे अवैध पद्धतीने तिकिटविक्री करणार्‍यांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असेही यंत्रणेने कळवले आहे. मुंबई, पुणे आणि बिहार येथील रेल्वे आरक्षणामध्ये अवैधपणे एकाच भ्रमणभाष क्रमांकावरून अनेक जणांची आरक्षणे होत असल्याचे या यंत्रणेच्या लक्षात आले. या पार्श्वभूमीवर अन्वेषण चालू केल्यावर हा प्रकार समोर आला आहे. अवैध तिकिट आरक्षण करणारे बहुतांश दलाल हे परदेशातील आहेत, असेही यंत्रणेचे पुणे विभागीय सुरक्षा आयुक्त उदयसिंह पवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. हे दलाल मुंबई, पुणे आणि बिहार या ठिकाणच्या रेल्वे गाड्यांची तिकिटे मोठ्या प्रमाणात आरक्षित करून ठेवतात. हे दलाल त्यांच्या कामाच्या पद्धती आणि कार्यप्रणाली सतत पालटत आहेत. त्यामुळे आम्हीही नूतन प्रणाली वापरून त्यांच्या एक पाऊल पुढे आहोत, असे पवार यांनी सांगितले.