संतांचे बोलणे सत्यात उतरल्याविषयी साधकाला आलेली प्रचीती !

श्री. वाल्मिक भुकन

‘वर्ष २०१९ मध्ये आम्ही सर्व कुटुंबीय दिवाळीसाठी घरी गेलो होतो. घरून रामनाथी आश्रमात परत आल्यानंतर मी एका सेवेच्या निमित्ताने एका संतांकडे गेलो होतो. तेव्हा त्यांनी मला विचारले, ‘‘दिवाळी आनंदात साजरी झाली का ?’’ त्यानंतर ते मला म्हणाले, ‘‘आता पुढच्या वर्षी दिवाळीसाठी घरी जायला नको. वेळ आणि पैसा दोन्हींचा व्यय होतो ना !’’ त्यावर मी त्यांना म्हणालो, ‘‘तुम्ही सांगाल, तसे करू. आम्ही घरी जाणार नाही.’’ त्यावर ते हसले आणि म्हणाले, ‘‘आता गावाकडे आपले काही राहिले नाही. आता हेच आपले गाव ! तिकडे तुझ्या २ बहिणी आहेत. त्यांनाच दिवाळीसाठी इकडे बोलावून घ्यायचे.’’ त्यावर मी म्हणालो, ‘‘हो. तसेच करतो.’’

‘पू. आजींना अर्धांगवायूचा झटका येणे आणि वर्ष २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे दळणवळण बंदी लागू होणे’, यांमुळे आम्हाला घरी जाणे शक्य नव्हते. ‘दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घर बंद असेल’, असा विचारही मी कधी केला नव्हता. केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे घरी न जाण्याविषयी कुटुंबियांच्या मनाची सिद्धता झाली आणि त्यांनी सर्व परिस्थिती साधना म्हणून आनंदाने स्वीकारली.’

– श्री. वाल्मीक भुकन (पू. लोखंडेआजींचा नातू (पू. आजींच्या मुलीचा मुलगा)), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.७.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक