तळोजा (जिल्हा रायगड) येथील महामंडलेश्वर स्वामी आबानंदगिरी महाराज यांच्या मठातील वृद्धाश्रमाची जागा कह्यात घेण्यासाठी ‘सिडको’कडून थेट नोटीस !

हिंदूंचे संत आणि सेवाभावी संस्था यांना थेट नोटीस पाठवणार्‍या ‘सिडको’ने अन्य धर्मियांच्या संदर्भात असे धारिष्ट्य दाखवले असते का ? – संपादक 

‘परमशांतीधाम’ वृद्धाश्रम

मुंबई, २ ऑगस्ट (वार्ता.) – महातपस्वी योगी प.पू. गगनगिरी महाराज यांचे शिष्य महामंडलेश्वर स्वामी आबानंदगिरी महाराज (जुना आखाडा) यांच्या तळोजा येथील ‘परमशांतीधाम’ या वृद्धाश्रमाची जागा कह्यात घेण्यासाठी सिडकोकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. मेट्रो रेल्वेच्या स्थानकासाठी जागा संपादित करण्यासाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. महातपस्वी योगी प.पू. गगनगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने हे सेवाकार्य चालू असूनही याविषयी पूर्वकल्पना देण्याचे साधे सौजन्यही सिडकोने दाखवलेले नाही. याविषयी महाराष्ट्रातील भाविक आणि स्थानिक यांच्याकडून संताप व्यक्त केला जात आहे.

नवी मुंबई रेल सिस्टीम प्रकल्पासाठी ही भूमी संपादित करण्यात येत आहे. याविषयी ३० जुलै २०२० या दिवशी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये वृद्धाश्रमाची जागा अधिग्रहीत करण्याविषयी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर १४ डिसेंबर २०२० या दिवशी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) कार्यालय, मेट्रो रेल्वे कार्यालय, तलाठी, मंडल अधिकारी, भूमी अभिलेख कार्यालय आदी विविध कार्यालयांचे अधिकारी आणि कर्मचारी वृद्धाश्रमात भूसंपादनाकरता आले होते; मात्र त्यांना विरोध करण्यात आल्यामुळे ते निघून गेले. याविषयी ‘परमशांतीधाम वृद्धाश्रम ट्रस्ट’च्या वतीने १४ डिसेंबर २०२० या दिवशी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) आणि भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक यांना पत्र पाठवून वृद्धाश्रमाच्या जागेचे भूसंपादन न करण्याची विनंती केली आहे; मात्र सिडकोने ही मागणी मान्य करता येणार नसल्याचे पत्राद्वारे कळवले आहे. आराखड्यात पालट करणे शक्य नसल्याचे सिडकोकडून उत्तर या जागेवर ‘मेट्रो रेल सिस्टीम प्रोजेक्ट’ करता आराखडा निश्चित करण्यात आला आहे. त्यामध्ये पालट करणे शक्य होणार नाही. या जागेचा भूसंपादनाचा प्रस्ताव वर्ष २०१८ मध्ये जिल्हाधिकार्‍यांना पाठवण्यात आला असून भूसंपादनाची प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे वृद्धाश्रमाची २१ गुंठे भूमी त्यातून वगळणे शक्य नसल्याचे सिडकोने कळवले आहे.

भूमीची मालकी न्यासाकडे !

रायगड जिल्ह्यातील कोयनावेळे येथील कोयना धरणग्रस्त श्रीमती सरस्वती कदम यांनी त्यांचे पती कै. मारुती कदम यांच्या स्मरणार्थ वर्ष १९८६ मध्ये २१ गुंठे भूमी वृद्धाश्रमासाठी दिली. महंत आबानंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाने ‘परमशांतीधाम वृद्धाश्रम न्यासा’ची (ट्रस्टची) स्थापना करून येथे वृद्धाश्रमाची इमारत बांधण्यात आली. १५ मार्च १९८८ पासून हा वृद्धाश्रम चालू करण्यात आला. श्रीमती सरस्वती कदम यांनी दिलेली भूमी परमशांतीधाम वृद्धाश्रम न्यासाच्या नावे आहे.

अखंडपणे चालू असलेले आश्रमाचे सेवाकार्य

या वृद्धाश्रमात सध्या ५१ वृद्ध आहेत. त्यांची सर्वतोपरी काळजी आश्रमाकडून घेतली जाते. त्यांच्याकडून एकही पैसा न घेता त्यांची सेवा केली जाते. त्यांचे जेवण, अल्पाहार, कपडे, औषधोपचार, शस्त्रकर्म आदी सर्व आलेल्या देणगीतून विनामूल्य केले जाते. कोणत्याही प्रकारे संपत्तीचा वाद निर्माण होऊ नये, यासाठी वृद्धांना आश्रमात घेतांना त्यांच्या संपत्तीचे वाटप झाल्यानंतरच त्यांना आश्रमात येण्यास सांगितले जाते. मागील ३२ वर्षांपासून अखंडपणे निष्काम वृत्तीने हे सेवाकार्य चालू आहे.

‘वृद्धांची सेवा बंद पडणार नाही’, याचा विचार सिडकोने करायला हवा ! – महामंडलेश्वर स्वामी आबानंदगिरी महाराज (जुना आखाडा), संस्थापक अध्यक्ष, परमशांतीधाम वृद्धाश्रम

महामंडलेश्वर स्वामी आबानंदगिरी महाराज

‘प.पू. गगनगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार भक्ती करत असतांना त्यांनी मला मानवतेची सेवा करायला सांगितली.  त्यानंतर गुर्वाज्ञेचे पालन म्हणून मी हा वृद्धाश्रम चालू केला. सरकार आई-वडिलांना सांभाळण्याचे आवाहन करत आहे; मात्र आज वृद्धांना सांभाळायला कुणी सिद्ध नाही. त्यामुळे हा वृद्धाश्रम चालू करावा लागला. येथे वृद्धांची सर्व सेवा केली जाते, तसेच मृत्यूनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कारही केले जातात. एकप्रकारे आम्ही वृद्धांना दत्तक घेतो. या वृद्धाश्रमाला शासनमान्यताही आहे. समाजकल्याण विभागाकडून प्रतिवर्षी २५ वृद्धांचे अनुदान आश्रमाला प्राप्त होते. समाजातून आलेल्या अन्य निधीतून अन्य वृद्धांना सांभाळले जाते. हा आश्रम वाचावा, यासाठी आमची धडपड चालू आहे. मेट्रोचे स्थानक मागे-पुढे उभारता येऊ शकते. सिडकोने ही जागा कह्यात घेतल्यास वृद्धांची सेवा बंद पडेल, याचा विचार केल्यास बरे होईल. वृद्धसेवा कायमस्वरूपी चालू रहायला हवी’, असे परमशांतीधाम वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष महामंडलेश्वर स्वामी आबानंदगिरी महाराज (जुना आखाडा)यांनी म्हटले आहे.