५६ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील जुळी बालके चि. प्रथमेश अन् चि. वेदश्री योगेश डिंबळे (वय दीड वर्ष) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. प्रथमेश आणि चि. वेदश्री ही आहेत !

चि. प्रथमेश डिंबळे
चि. वेदश्री डिंबळे

पुणे येथील साधिका सौ. वसुधा डिंबळे यांना गर्भधारणेपूर्वी आलेल्या अनुभूती, गर्भात जुळी बाळे असल्याची मिळालेेली पूर्वसूचना, गरोदरपणी त्यांनी केलेली साधना आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय यांविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. गर्भधारणेपूर्वी आलेल्या अनुभूती

सौ. वसुधा डिंबळे

१ अ. एका अनोळखी व्यक्तीने ‘तुम्ही कुलदेवाला गेला नाहीत’, असे सांगून ‘कुलदेव कोणता आहे ?’ ते सांगणे आणि ‘कधी जाणार ?’, असे सारखेे विचारणे

‘ऑक्टोबर २०१८ मध्ये एका दुकानात अकस्मात् एक अज्ञात व्यक्ती मला म्हणाली, ‘‘तुम्ही कुलदेवाला जाऊन आला नाही.’’ आमच्या लग्नानंतर आम्ही जेजुरी येथील खंडोबाला गेलो होतो; म्हणून मी त्यांना ‘‘आम्ही जाऊन आलो’’, असे सांगितले. तेव्हा ती व्यक्ती ‘‘जेजुरीचा नाही, पालीचा (जि. सातारा) खंडोबा तुमचा कुलदेव आहे. तुम्ही तिकडे कधी जाणार ?’’ असे मला सारखी विचारू लागली. मी ‘जाऊन येऊ’, असे त्यांना म्हणाले; पण त्यांचे समाधान झाले नाही. शेवटी मी त्यांना ‘‘आम्ही निश्‍चित जाऊन येऊ’’, असे सांगितल्यावर त्यांनी विचारणे थांबवले. घरी आल्यावर मी यजमानांना घडलेला प्रसंग सांगितला. तेव्हा त्यांनीही ‘पाली येथील खंडोबा आपला कुलदेव आहे; पण मी एकदाही तिथे गेलो नाही’, असे सांगितले.

१ आ. विष्णुसहस्रनाम म्हणू लागल्यावर यजमान कुलदेवाच्या दर्शनाला जाण्यासाठी स्वतःहून सिद्ध होणे

यजमानांचा अशा गोष्टींवर फारसा विश्‍वास नसल्याने ते तिथे जाण्याविषयी नुसतेच ‘बघू, जाऊ’, असे म्हणत होते. मधल्या काळात मी ‘देवाला प्रार्थना करणे’, इतकेच करत होते. फेब्रुवारी २०१९ मध्ये एका ओळखीच्या काकांनी मला विशिष्ट दिवसापर्यंत ‘विष्णुसहस्रनाम म्हणा’, असे सांगितले. त्याप्रमाणे मी ते म्हणण्यास चालू केले. नंतर काही दिवसांतच यजमान स्वतःच कुलदेव आणि कुलदेवी यांच्या दर्शनाला जाण्यास सिद्ध झाले.

१ इ. कुलदेवीच्या आशीर्वादाने सर्व अडचणी दूर होणे आणि त्याच मासात गर्भधारणाही होणे

घरातील काही अडचणींमुळे मी आणि यजमान अन्यत्र रहायला जाण्याचा विचार करत होतो. कुलदेवीच्या दर्शनाला गेल्यावर मी तिला प्रार्थना केली, ‘आमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन जन्माला येणार्‍या बाळासाठी योग्य जागा मिळू दे.’ त्यानंतर २ मासांतच यजमानांना अपेक्षित अशी नोकरी मिळाली. घर मिळण्यातील आमची अडचण दूर झाली आणि त्याच मासात मला गर्भधारणाही झाली. अशा प्रकारे कुलदेवीला प्रार्थना केल्यानंतर सर्वकाही त्याच क्रमाने घडत आहे’, असे मला अनुभवता आले. या सर्व प्रसंगात ‘देव मला साहाय्य करत आहे’, अशी अनुभूती मी सातत्याने येत होती.

१ ई. नरसोबाच्या वाडीला जातांना मन शांत होणे, ‘येथून पुढे आयुष्यात पालट होणार आहे’, असे विचार येणे, वाडीला जाऊन आल्यावर ‘स्वतःभोवती किंवा जवळ सूक्ष्मातून नागांचे अस्तित्व जाणवून ‘ते रक्षणासाठी आले आहेत’, असे वाटणे

याच कालावधीत आम्ही नरसोबावाडीला गेलो होतो. नरसोबाची वाडी जवळ येत होती, तशी माझ्या मनाची स्थिती अधिक शांत होत गेली. मला प.पू. भक्तराज महाराज यांची आठवण येऊन मी त्यांची भजने मोठ्याने म्हणू लागले. त्या वेळी माझ्या मनात ‘यापुढे माझे आयुष्य पालटणार आहे’, असा विचार येऊन गेला. वाडीला जाऊन आल्यानंतर अनेक दिवस मला माझ्या सभोवती नागांचे सूक्ष्म अस्तित्व जाणवायचे. घरातील लादी पुसतांना लादीवर त्यांचे सूक्ष्मातून दर्शन होऊन ‘ते माझ्या रक्षणासाठी आले आहेत’, असा विचार येऊन भीती न्यून झाली.

श्री. योगेश डिंबळे

२. गर्भधारणा झाल्याविषयी मिळालेल्या पूर्वसूचना

२ अ. रस्त्यावरून जातांना ‘गर्भ संवाद करत आहे’, असे दोन वेळा जाणवणे आणि आधुनिक वैद्यांकडे गेल्यावर गर्भधारणा झाल्याचे निदान होणे

२७ मे या दिवशी आस्थापनात जातांना गतीरोधकावरून माझी दुचाकी जोरात पुढे गेली. त्या वेळी आतून ‘आई, मी आहे, गाडी हळू चालव’, असा आवाज मला ऐकू आला. तो माझ्या नोकरीचा पहिलाच दिवस होता. पुष्कळ रहदारी आणि पत्ता शोधण्यात बराच वेळ गेल्याने मला थकवा येऊन मी पुन्हा घरी परतण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी ‘स्वतःची शारीरिक स्थिती आणि यजमानांना आर्थिकदृष्ट्या साहाय्य करू शकत नाही’, या विचारांनी मला निराशा आली. तेव्हा मला पुन्हा आतून ऐकू आले, ‘आई, तू निराश होऊ नको. आधी आधुनिक वैद्यांकडे जा. तेथे तुला आनंदाची बातमी मिळेल !’ त्याप्रमाणे मी आधुनिक वैद्यांकडे गेले. त्यांनी आवश्यक त्या चाचण्या करून मला ‘गर्भधारणा झाली आहे’, असे सांगितले. अशा प्रकारे पोटातल्या गर्भाने मला त्याचे अस्तित्व आधीच लक्षात आणून दिले.

२ आ. ‘सोनोग्राफी’ करण्यासाठी जातांना गर्भाने ‘आम्ही दोघे आहोत’, असे सांगणे आणि आधुनिक वैद्यांनी ‘जुळे आहे’, असे सांगणे

आधुनिक वैद्यांनी १५ दिवसांनी ‘सोनोग्राफी’ करण्यासाठी मला बोलावले होते. ‘सोनोग्राफी’ करण्याच्या एक दिवस आधी मी पोटावर हात ठेवून नामजप करतांना मला पुन्हा आवाज आला, ‘आई आम्ही दोघे जण आहोत.’ दुसर्‍या दिवशी आम्ही ‘सोनोग्राफी’साठी गेलो. तपासणी केल्यावर आधुनिक वैद्यांनी आम्हाला ‘जुळे आहे’, असे सांगितले.

३. गरोदरपणी केलेली साधना आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय

३ अ. विविध स्तोत्रे म्हणणे

मी ‘श्रीसूक्त, रुद्र पाठ, विष्णुसहस्रनामस्तोत्र, अथर्वशीर्ष इत्यादी स्तोत्रे म्हणत असे. बगलामुखीस्तोत्र म्हणतांना आणि ध्यानाच्या वेळेत नामजप करतांना गर्भांची हालचाल होत असे.

३ आ. गणेशाची उपासना करणे

मी दशभुजा गणपतीच्या मंदिरात दर्शनासाठी जात होते. याच काळात माझे आई-बाबा जयपूर (राजस्थान) येथे गेले होते. त्यामुळे मला तेथील त्रिनेत्र गणेशाचा प्रसादही मिळाला.

३ इ. गर्भाशयाची मानस शुद्धी करून गर्भांना श्रीविष्णूच्या चरणी ठेवणे

कधी कधी मी गर्भाशयाची मानसशुद्धी करायचे. तिथे सर्व बाजूंनी सूक्ष्मातून मानस नामजप लावायचे आणि दोन्ही गर्भांना भगवान श्रीविष्णु यांच्या चरणांशी ठेवायचे. तसे केल्यावर माझे मन निश्‍चिंत होत असे.

३ ई. गर्भांना नामजप आणि जयघोष करायला सांगणे

मी दोन्ही गर्भांना दत्त आणि श्रीकृष्ण यांचा नामजप करण्यास शिकवायचे अन् जयघोष करायला सांगायचे. त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचून दाखवायचे. कधी ‘मी छोटे रूप घेऊन गर्भाशयात बाळांना मांडीवर घेऊन ‘आम्ही बसून नामजप करत आहोत’, असा भाव ठेवायचे.

३ उ. सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचे वाचन करणे

मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘साधना आणि शंकानिरसन’ या ध्वनीफिती ऐकत होते, तसेच ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन ग्रंथ’, ‘सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचे साधनापूर्व जीवन आणि साधनाप्रवास’ हा ग्रंथ, स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेचे ग्रंथ आणि पू. भार्गवराम अन् पू. वामन राजंदेकर या बालसंतांवरील ग्रंथ यांचे मनापासून वाचन केले.

संपूर्ण ९ मासांच्या कालावधीत मला आनंदी रहाण्याची पुष्कळ ओढ लागली होती.

४. गरोदरपणी आलेल्या अनुभूती

४ अ. दुसरा मास

मला डोळे बंद केल्यावर किंवा उघड्या डोळ्यांनीही नदीचा घाट दिसे. ‘त्या ठिकाणी आश्रम असून ऋषी यज्ञ करत आहेत आणि मी तेथे पाणी भरत आहे’, असे दृश्य दिसायचे. मला संस्कृत वैदिक मंत्रांचे स्वर ऐकू यायचे.

४ आ. पाचवा मास

या मासात मला ‘डेंग्यू’ झाला. सलग तीन दिवस माझा ताप उतरत नव्हता. त्या वेळी मी सतत दत्ताचा नामजप करायचे आणि भजने ऐकायचे. त्यानंतर माझा ताप उतरला. ‘डेंग्यू’ होऊनही माझे वजन न्यून झाले नाही’, याचे आधुनिक वैद्यांना आश्‍चर्य वाटले. ‘डेंग्यू’मुळे गर्भाला धोका होऊ शकतो’, असे मला प्रसूतीनंतर समजले. त्या वेळी ‘देवानेच गर्भांचे रक्षण केले’, असे मला जाणवले.

५. गर्भ सात्त्विक असल्याची जाणीव होणे

अ. चौथ्या मासात सेवेच्या निमित्ताने साधकांच्या घरी गेल्यानंतर गर्भांची आनंदाने हालचाल होत असे.

आ. ‘धर्मरथावरील, तसेच नवरात्रीमध्ये चतुःशृंगी येथील ग्रंथ प्रदर्शनाची सेवा देवानेच माझ्याकडून करून घेतली.

अशा प्रकारे विवाह झाल्यानंतर थांबलेली माझी समष्टी सेवा मी गरोदर राहिल्यानंतर पुन्हा चालू झाली.

६. एखादी कृती करतांना ‘गर्भांना त्रास होऊ नये’; म्हणून त्यांना सांगून करणे

संपूर्ण गरोदरपणात मी सर्व कृती गर्भांना सांगून करायचे आणि दोन्ही गर्भ मला साहाय्य करायचे, उदा. ‘मिक्सर’ लावतांना आवाजाचा त्रास होऊ नये; म्हणून मी गर्भांना ‘कान झाकून घ्या’, असे सांगायचे. खाली वाकतांना, झाडून घेतांना, रिक्शात अथवा गाडीवर बसतांना ‘त्यांना सांभाळून बसा’, असे सांगायचे.

७. प्रसुती

१२.१२.२०१९ या दिवशी माझी प्रसुती होऊन मला मुलगा आणि मुलगी, अशी जुळी मुले झाली. जन्मानंतर दोन्ही बाळांना अतिदक्षता विभागात ठेवले होते. त्यामुळे ३ दिवसांनी मला बाळांना पहाता आले. त्या वेळी श्री. महेश पाठक आणि सौ. मनीषा पाठक या दोघांनी मला देवावर पूर्ण श्रद्धा ठेवून सकारात्मक रहाण्यासाठी पुष्कळ साहाय्य केले. मनीषाताई भ्रमणभाषवरून माझ्या संपर्कात रहात असे. तिने माझ्यासाठी आधारस्तंभाची भूमिका निभावली.

८. सौ. मनीषा पाठक यांनी आध्यात्मिक स्तरावर केलेले साहाय्य !

८ अ. बाळांच्या नाजूक स्थितीमुळे मनाचा पुष्कळ संघर्ष होत असतांना मनीषाताईने ‘देवावर दृढ श्रद्धा ठेवून संघर्ष कर. ती तुझी साधना आहे’, असे सांगून बळ देणे

या परिस्थितीत कधी कधी मला साधनेचे दृष्टीकोन ठाऊक असूनही स्थिर रहाता यायचे नाही आणि ‘स्थिर का रहाता येत नाही ?’, असे वाटून अपराधी वाटायचे. माझ्या मनाचा पुष्कळ संघर्ष व्हायचा. मनीषाताईने माझ्या मनाची स्थिती अचूक ओळखली आणि मला सांगितले, ‘‘कितीही संघर्ष झाला, तरी देवावर श्रद्धा ठेवून संघर्ष करायचा आहे. तीच तुझी साधना आहे. कधी वाटले, ‘आता जमत नाही, तर लगेच मला भ्रमणभाष कर. अगदी कुठल्याही वेळी, रात्री-अपरात्रीही कर; पण हार मानायची नाही. जे वाटते, ते मोकळेपणाने बोल !’’ त्या काळात मनीषाताईने मला फार मोठा आधार दिला.

८ आ. मनीषाताईने कधीही खोटी आशा दाखवून वास्तवापासून दूर न नेता परिस्थिती स्वीकारायला साहाय्य करून आध्यात्मिक स्तरावर जपणे

त्या संपूर्ण काळात मनीषाताई मला पूर्णपणे आध्यात्मिक स्तरावर जपत होती. माझे मन आशा शोधत होते; पण मनीषाताई मला कुठेही खोटी आशा न दाखवता साधनेच्या साहाय्याने वास्तव स्वीकारायला शिकवत होती. काही वेळा बाळांच्या या स्थितीसाठी आमचे नातेवाईक मला दोष द्यायचे. काही नातेवाईक ‘बाळे नाहीत, तर जाऊन काय करणार ?’, असे म्हणून भेटायलाही आले नाहीत. काहींच्या बोलण्यातही शंका असायची. याउलट साधकांच्या बोलण्यामुळे माझी श्रद्धा आणि मनाची सकारात्मकता वाढायची. त्यामुळे साधक भेटल्यावर मला त्याही स्थितीत आनंदी वाटायचे.

९. आध्यात्मिक स्तरावरील उपाय केेल्यावर आलेल्या अनुभूती

९ अ. बाळांच्या नाजूक शारीरिक स्थितीत केलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय

दोन्ही बाळांची शारीरिक स्थिती सतत पालटत होती. काही दिवसांनी दोघांनाही दूध पचेनासे झाले आणि उलट्या होऊ लागल्या. मुलीचे दूध पिणे पूर्ण बंद होऊन तिला श्‍वसनासाठी कृत्रिम श्‍वास देणारी यंत्रणा लावली गेली. तेव्हा मी दोन्ही बाळांच्या पेटीजवळ उभे राहून रामरक्षा, गणपतिस्तोत्र, मारुतिस्तोत्र म्हणायचे आणि उपायांसाठी नामजप करायचे. सूक्ष्मातून त्यांना देवाच्या चरणी ठेवून ‘त्यांना वेदना सहन करता याव्यात’; म्हणून देवाला शक्ती मागायचे.

९ आ. मुलीचे शस्त्रकर्म टळणे

आधुनिक वैद्यांनी ‘मुलीच्या तपासण्यांमध्ये काही कारण सापडले नाही. शस्त्रकर्म करून तिच्या आतड्यांमध्ये काही अडकले आहे का ?’ हे पहाण्यासाठी तज्ञ वैद्यांचा समादेश घ्यावा लागेल’, असे सांगितले. मी हे सर्व मनीषाताईला सांगितले. तिने उपाय म्हणून सांगितलेला नामजप करतांनाच आम्ही ‘सूक्ष्मातून मुलीच्या पोटाची शुद्धी करणे, तिच्या आतड्यांमध्ये श्रीकृष्णाचा नामजप लिहिणे, प्रार्थना करणे’, आदी उपाय करत होतो.

दुसर्‍या दिवशी आलेल्या विशेष तज्ञांनी तिला तपासून ‘शस्त्रकर्म करण्याची आवश्यकता वाटत नाही. तिला थोडे दूध देऊन ते पचवण्याचे ध्येय देऊया. तिला लढता येऊ दे. मग बघू काय होते ते’, असे सांगितले. त्या वेळी कृतज्ञतेने भाव जागृत होऊन मी खोलीत येऊन कृष्णाच्या चित्रापुढे पुष्कळ रडले.

९ इ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे सूक्ष्मातून दर्शन होणे

बाळांचा अतीदक्षता विभाग आणि माझी खोली यांत पुष्कळ अंतर असल्याने ये-जा करून मला दमायला व्हायचे. एकदा रात्री बाळांना दूध देण्यासाठी जातांना मी दमून मध्येच थांबले. तेव्हा मला जिन्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे सूक्ष्मातून दर्शन झाले. त्या माझ्याकडे पाहून पुष्कळ प्रेमाने हसत होत्या आणि मला वर बोलावत होत्या. त्यांच्या त्या प्रेमळ हसण्याने मी माझा थकवा विसरून गेले आणि ‘कधी तो जिना चढले?’, ते मलाही कळले नाही.

१०. बाळांचे नामकरण करतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्याविषयी आलेल्या अनुभूती

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांची अनुभवलेली सर्वज्ञता ! : बाराव्या दिवशी बाळांच्या नामकरण विधीसाठी मी बाळांची प्रत्येकी ४ नावे सद्गुरु स्वातीताईंना पाठवली. मला गणपतीच्या संदर्भात आलेल्या अनुभूतींमुळे मुलाचे ‘प्रथमेश’ आणि मुलीचे ‘वेदश्री’, हे नाव आवडले होते. मी सद्गुरु स्वातीताईंना या नावांसमवेत अन्य तीन नावेही पाठवली; पण त्यांनी ‘प्रथमेश’ आणि ‘वेदश्री’ ही नावे ठेवून बाळांचे नामकरण केले. त्यांना गरोदरपणातील माझ्या गणपतीच्या उपासनेविषयी काही ठाऊक नव्हते किंवा ‘आम्हाला कुठली नावे आवडली आहेत ?’, हेही ठाऊक नव्हते, तरीही त्यांनी तीच नावे ठेवून बाळांचे नामकरण केले.

११. प्रथमेशने सद्गुरु स्वातीताईंना दिलेला प्रतिसाद !

अ. दोघे २ मासांचे असतांना सद्गुरु स्वातीताई बाळांना बघण्यासाठी घरी आल्या होत्या. त्या दिवशी दिवसभर प्रथमेश झोपून होता; पण सद्गुरु स्वातीताईंचा आवाज ऐकून त्याने स्वतःहून पायांची हालचाल करून प्रतिसाद दिला.

आ. सद्गुरु स्वातीताई घेत असलेला ‘विष्णुलीला सत्संग’ संपतांना त्यांच्या आवाजात सद्गुरूंचा श्‍लोक ऐकतांना प्रथमेश ओळख असल्याप्रमाणे आनंदाने हसला.

१२. प्रथमेश आणि वेदश्री यांची जाणवलेली वैशिष्ट्ये

१२ अ. सामाईक वैशिष्ट्ये

१. दोघांचीही झोप अल्प आहे; पण नामजप लावल्यावर दोघेही शांत झोपायचे.

२. जन्मापासून झोपतांना दोघांच्याही हातांच्या बोटांच्या मुद्रा केलेल्या असतात.

३. दोघांना आनंदी आणि शांत वातावरणात रहायला अधिक आवडते.

४. दोघेही सहनशील आणि समजूतदार आहेत. काही कामामुळे कधी मला त्यांना जेवण भरवण्यास उशीर झाला, तरी ती यजमानांसमवेत किंवा आपापले खेळतात. आम्हा दोघांची सेवा चालू असेल, तर ते आम्हा दोघांपैकी एकाकडे शांत बसतात.

१२ आ. प्रथमेशची वैशिष्ट्ये

१. प्रथमेशचे कान आणि डोक्याचा मागचा भाग बाल गणेशाप्रमाणे वाटतो.

२. प्रथमेशच्या हाताकडे पाहून मला प.पू. भक्तराज महाराज यांच्या खंजिरी वाजवणार्‍या हातांचे स्मरण होते. एका ज्योतिषांनी ‘त्याचा हात वादकाचा आहे’, असे सांगितले आहे.

३. मला कधी कधी प्रथमेशमध्ये कृष्णतत्त्व जाणवते.

१२ इ. वेदश्रीची वैशिष्ट्ये

१. वेदश्रीमध्ये उत्तम निरीक्षणक्षमता, धाडस आणि नेतृत्व हे गुण जाणवतात.

२. नवीन कुठलीही कृती करतांना तिला भीती नसते. ‘रांगणे, धरून उभे रहाणे, धरून चालणे, हाताने जेवणे’, हे सर्व वेदश्री स्वतःच करू लागली. तिला शिकवावे लागले नाही.

३. प्रथमेशने तिच्या हातातून काही वस्तू घेतली किंवा तिला ओढले, तरी ती त्याला मारत नाही.

१३. ‘साधनेचा परिणाम म्हणून दोन्ही बाळे अतीदक्षता विभागातून लवकर बाहेर पडली असून ‘हा देवाचा कृपाशीर्वादच आहे’, असे आधुनिक बालरोगतज्ञांनी सांगणे

आम्ही प्रथमेशला दाखवण्यासाठी सनातनच्या एका हितचिंतक आधुनिक बालरोग तज्ञांकडे गेलो होतो. तेव्हा ते म्हणाले, ‘‘इतक्या लवकर बाळे बरी होऊन अतीदक्षता विभागातून बाहेर पडत नाहीत. हा तुम्ही करत असलेल्या साधनेचा परिणाम असून ‘दोन्ही बाळे तिथून लवकर बाहेर आली’, ही तुमच्यावर झालेली देवाची कृपाच समजा !’’

१४. अनुभूती

रात्री जोराचा पाऊस असतांना दिवे गेल्याने भीती वाटणे आणि प.पू. भक्तराज महाराज अन् श्रीकृष्ण यांचे अस्तित्व जाणवून अल्प तेलात देवघरातील दिवा अनेक घंटे तेवणे : सप्टेंबर मासात पुण्यात फार मोठा पाऊस पडून मोठी हानी झाली होती. पाऊस झाला, त्या रात्री मी घरी एकटीच होते. दिवेही गेले होते. यजमान सेवेसाठी बाहेर गेले होते आणि पावसात अडकले होते. पावसाचा आवाज ऐकूनही मला भीती वाटत होती. त्या वेळी मला घरात प.पू. भक्तराज महाराज यांचे अस्तित्व जाणवले. ते ‘खरोखरंच देवघराच्या ठिकाणी आहेत आणि श्रीकृष्ण माझ्यासमवेत स्वयंपाकघरात आहे’, असे मला दिसले. त्या रात्री देवाजवळ लावलेला दिवा आहे त्या तेलातच साडेतेवीस घंटे तेवत होता. त्यानंतरही दिव्यात तेल शिल्लक होते. ती देवाच्या अस्तित्वाची साक्षच होती. मी गरोदर असतांनाही अनेकदा दिवा अधिक काळ तेवत असे. नंतर असे कधी घडले नाही.

१५. कृतज्ञता आणि प्रार्थना

गुरुदेव, ‘दोन्ही बाळे गर्भात असतांना आणि नंतरही तुम्हीच बाळांचे रक्षण केले’, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. माझ्या पोकळ प्रार्थनेलाही तुम्ही प्रतिसाद दिलात. ‘स्थूल देहा असे स्थळकाळाची मर्यादा ।’, या तुमच्या वचनाची मी अनंत वेळा अनुभूती घेतली. गरोदरपणाच्या काळात साधकांनीही मला पुष्कळ साहाय्य केले. माझ्या सर्व इच्छा पुरवल्या. गुरुदेव, हे सर्व प्रेम मला केवळ आणि केवळ आपल्यामुळे मिळाले ! या सगळ्या ऋणांची मला अखंड जाणीव राहू दे. मी साधकांप्रती आणि आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.

‘गुरुदेव, या दोन्ही जिवांवर आपल्याला अपेक्षित असे संस्कार मला करता येऊ देत. दोघांचेही जीवन राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी आपल्या श्रीचरणी समर्पित होऊन त्यांच्या आयुष्याचे खर्‍या अर्थाने सार्थक होऊ दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. वसुधा योगेश डिंबळे, पुणे (४.१.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.