सांगली महापालिका क्षेत्रातील १३६ इमारती धोकादायक

५४ मालमत्ताधारकांना धोकादायक इमारतींतून नागरिकांना उतरवण्यासाठी नोटीस

सांगली – सांगली महापालिका क्षेत्रात १३६ इमारती धोकादायक असून महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार आतापर्यंत ५४ मालमत्ताधारकांना आपल्या इमारती उतरवून घेण्याविषयी नोटीस बजावण्यात आली आहे, तर उर्वरित मालमत्ता धारकांनाही नोटीस देण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिली.

१. संभाव्य पावसाळा लक्षात घेता, आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार महापालिका क्षेत्रात असणार्‍या धोकादायक इमारतींचा आढावा महापालिका उपायुक्त राहुल रोकडे यांनी घेतला. या बैठकीला प्रभागाचे साहाय्यक आयुक्त उपस्थित होते. या वेळी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले की, संबंधित मालमत्ताधारकांनी इमारती न उतरवल्यास आणि एखादी दुर्घटना घडल्यास त्यांना उत्तरदायी धरले जाईल.

२. १३६ धोकादायक इमारतींमधील मिरज येथील २ धोकादायक इमारती संबंधितांनी तात्काळ उतरवण्यास प्रारंभ केला आहे. अन्य मालमत्ताधारकांनीही आपल्या धोकादायक इमारती तात्काळ उतरवून संभाव्य दुर्घटना टाळावी, अन्यथा महापालिका प्रशासन अशा इमारती पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने उतरवून घेईल, अशी चेतावणी उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिली आहे.