पणजी, २९ मे (वार्ता.) – कोरोना महामारीमुळे राज्यात ३० मे या दिवशी घटकराज्य दिनाच्या निमित्ताने शासकीय स्तरावर कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ३४ वर्षांपूर्वी ३० मे या दिवशी केंद्रशासित प्रदेश असलेल्या गोवा राज्याला घटकराज्याचा दर्जा देण्यात आला आहे.
अर्थव्यवस्थेला उर्जितावस्था आणणे, ही काळाची आवश्यकता !
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘राज्यात सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे आणि राज्यशासन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. कोरोना महामारीच्या या सध्याच्या स्थितीमुळे अनेक आव्हाने सरकारसमोर उभी राहिली आहेत. राज्याच्या अर्थव्यवस्थेला उर्जितावस्था आणणे, ही काळाची आवश्यकता बनली आहे. राज्यशासन विद्यमान आणि पुढची आव्हाने यांना तोंड देण्यासाठी सिद्ध आहे.’’
|
कोरोना महामारी संपुष्टात आल्यानंतर गोवा शासन पर्यटन आणि खाण उद्योग पुनर्जीवित करण्यास प्राधान्य देणार आहे. आम्ही सर्व आव्हाने पेलू शकणार याविषयी शंका वाटत नाही. गोवा राज्य विकासाच्या दृष्टीने नक्कीच वाटचाल करेल, अशी आशा गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गोमंतकियांना घटकराज्य दिनाच्या निमित्ताने दिलेल्या शुभसंदेशात व्यक्त केली आहे.