३१ मार्च २०२१ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (तिथीनुसार) आहे. यानिमित्ताने…
शिवजयंतीला आई जगदंबा आणि भगवान शिव यांना साकडे !
अहोरात्र लाथाबुक्यांचे अखंड प्रहार सहन करत उभा असलेला सह्याद्रीचा स्तंभ कडकडला, दाही दिशा थरथरल्या, काळपुरुषाच्याही कानठळ्या बसल्या आणि जनशक्तीचा अन् शिवशक्ती यांचा नृसिंह या स्तंभातून प्रचंड गर्जना करत प्रकटला, अनंत हातांचे अन् अगणित तीक्ष्ण नखाग्रहांचे ते नृसिंह होते शिवराय ! (संदर्भ : शिवकल्याण राजा)
‘शिवराय’ या ४ अक्षरी मंत्रानी अवघ्या युवा पिढीमधील शौर्याला शतकानुशतके प्रेरणा दिली. तिथीनुसार कि दिनांकानुसार, हे सोडाच ज्याच्या हृदयात छत्रपती शिवरायांचा जन्म प्रत्येक दिवशी होतो, या शिवरुद्राच्या अस्तित्वाने ज्याच्या हृदयात देव, देश आणि धर्म यांचा विचार ओतप्रोत भारवलेला असतो आणि जो यांवर होणार्या आघातांना सडेतोड उत्तरे देण्यासाठी शिवशक्तीच्या असीम शौर्याने सिद्ध असतो, तो खरा मावळा ! असा मावळा केवळ महाराष्ट्रात नाही, तर संपूर्ण हिंदुस्थानासह संपूर्ण विश्वात निर्माण झाला आहे. हिंदुस्थानाचे हिंदवी स्वराज्य महाराष्ट्रात स्थापन करून, विश्वाचे हिंदवी स्वराज्य ‘भारत भू’ करण्याचे ध्येय शिवरायांनी या प्रत्येक मावळ्याला दिले. त्याच प्रत्येक मावळ्याच्या हृदयातील आर्त प्रार्थना आज जगदंबेला अर्पण करत आहे. हे सर्व मावळे आई जगदंबा आणि भगवान शिव यांना साकडे घालण्यासह आर्ततेने विनवणी करत आहेत, ‘‘ज्यांच्यामुळे माझ्या आई-बहिणीच्या कपाळावर कुंकू आहे, ज्यांच्यामुळे आमचा भगवा ध्वज आमच्या मंदिरांवर आणि घरावर फडकतो आहे, ज्यांच्यामुळे आम्ही हिंदु म्हणून ताठ मानेने जगत आहोत, ज्यांनी आमचे देवाप्रमाणे रक्षण केले, ज्यांना आम्ही देवासमान पूजतो, ते आम्हा सर्वांचे आराध्य छत्रपती शिवरायांचा जन्म पुन्हा आमच्या विचारांत, हृदयात, मनात आणि कृतीत होऊ दे.’’ शिवरायांमध्ये आई जगदंबा आणि भगवान महादेव या दोहोंच्या शक्ती सामावलेल्या होत्या. त्या शिवशक्तीचे आवाहन आजच्या शिवजयंतीच्या दिनी करून हिंदु राष्ट्राचा संकल्प श्रीगुरुचरणी अर्पण करत आहे.
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयांतील ‘आर्यन संघ’ नावाच्या चौथ्या भोजनसंघामध्ये प्रत्येक आठवड्यास म्हणण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी वर्ष १९०२ मध्ये रचलेली छत्रपती शिवरायांची ही आरती आज माझ्यासाठी प्रार्थनारूपी आत्मनिवेदन ठरले. माझ्या श्रीगुरूंच्या चरणी मी आत्मनिवेदन व्यक्त करत आहे.
जय देव, जय देव, जय जय शिवराया ।
या, या अनन्य शरणा, आर्या ताराया ॥ धृ. ॥
हे आई जगदंबे, हे महादेवा, हृदयातील शौर्याने, अधीर हृदयातून छत्रपती शिवरायांचा जयजयकार करून, आम्ही आवाहन करतो की, आर्यांना म्हणजे आर्य सनातन वैदिक हिंदूंना तारण्यासाठी, धर्माच्या रक्षणार्थ आमच्या नसानसांत, रोमारोमांत, विचारांत, हृदयात, मनात आणि कृतीत छत्रपती शिवरायांचा जन्म होऊ दे.
आर्यांच्या देशावरी म्लेंच्छांचा घाला ।
आला आला सावध हो शिव भूपाला ॥
सद्गदीता भूमाता दे तुज हाकेला ।
करुणारव भेदूनी तव हृदय न का गेला ॥ १ ॥
हे जगदंबे, या आर्यांच्या म्हणजे हिंदूंच्या देशावर म्लेंच्छांचा म्हणजे धर्मांधांचा, जिहादी आतंकवाद्यांचा, वासनांधांचा आणि भ्रष्टाचार्यांचा घाला घातला जात आहे. शत्रू घरात घुसून मंदिरे, गोमाता अन् हिंदु स्त्रिया लुटू लागला आहे. आता सावध नाही झालो, तर काही गय नाही. सद्गतीत झालेली ही भूमाता, माझी मातृभूमीही तुला हाक मारते आहे, ‘आई जगदंबे, आता करुणा कर आणि या शिवशक्तीला आमच्या प्रत्येक हिंदूच्या हृदयात जागृत करून आम्हास हिंदु राष्ट्र स्थापनेस बळ दे.’ म्हणून आम्ही तुम्हाला साकडे घालतो महादेवा, ‘या शिवशक्तीचा जन्म आमच्यात होऊ दे. या हिंदु नृसिंहाचा जन्म आम्हा प्रत्येकाच्या हृदयात होऊन या मायभूमीचे रक्षण करण्यासाठी आम्हाला शक्ती द्या.’
श्रीजगदंबाजी तव शुम्भादीक भक्षी ।
दशमुख मर्दुनि श्री श्री रघुवर संरक्षी ॥
ती पूता भूमाता, म्लेंच्छांही छळता ।
तुजवीण शिवराया तिज कोण दुजा त्राता ॥ २ ॥
हे जगदंबे, तू भक्तांच्या रक्षणासाठी शुंभ निशुंभांना ही भक्षीले आहेस. हे महादेवा, त्या दशमुख रावणाचे मर्दन करण्यासाठी तुम्ही श्रीविष्णूंना श्रीराम अवतारातही तुमची शक्ती दिली आहे. आज त्याच भूमातेचा या म्लेंच्छांनी म्हणजे या धर्मांधांनी छळ चालवला आहे, आतंकवादी गिधाडासारखे मातृभूमीचे लचके तोडण्यासाठी टपून बसले आहेत, नराधम वासनांधांनी बलात्काराच्या आघाताने सर्वत्र हाहाःकार माजवला आहे, दुष्टांनी सर्वत्र थैमान घातले आहे. अशा स्थितीत शिवशक्तीखेरीज या मातृभूमीला कोण तारणार आई जगदंबे ? म्हणून आम्ही साकडे घालतो शिवशंभो, आमच्या हृदयात रुद्रावताराचा म्हणजे शिवशंभू शक्तीचा जन्म होऊ दे.
त्रस्त आम्ही दीन आम्ही शरण तुला आलो ।
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो ॥
साधू परित्राणाया दुष्कृती नाशाया ।
भगवान भगवद्गीता सार्थ कराया या ॥ ३ ॥
जय देव, जय देव, जय जय शिवराया ।
या, या अनन्य शरणा, आर्या ताराया ॥ धृ. ॥
हे भोलेनाथा, तू आमचा भोळा शंकर आहेस, हे आई जगदंबे, तुला आम्ही शरण आलो आहोत. सर्वत्रच्या राष्ट्र-धर्मावरील आघातांनी, हिंदु स्त्रियांवरील अत्याचारांनी अन् मंदिरांवर घाला घातल्याने या पाकिस्तानरूपी अफझलखान आणि चीनरूपी दानव यांनी तुझे भक्त त्रस्त अन् दिन झाले आहेत. हिंदूंचे शौर्य दिसेनासे झाले आहे, हे शिवशंभो ! कित्येक हिंदु निष्क्रिय होऊन मरण पत्करत आहेत, आई जगदंबे ! हे शिवशंकरा महादेवा, श्रीविष्णूंनी श्रीकृष्णरुपात सांगितलेली भगवद्गीता सार्थ करण्याची वेळ आता आली आहे. महादेवा आता जन्म होऊ दे त्या तांडवाचा आमच्या हृदयात ! आता जन्म होऊ दे त्या रुद्राचा या हृदयात ! आता जन्म होऊ दे त्या नरसिंहाचा आमच्या हृदयात ! आता जन्म होऊ दे, अफझल्याचा कोथळा काढून आतंकवाद कसा संपवायचा असतो, हा धडा विश्वाला देणार्या शिवरायांचा आमच्या हृदयात ! हे महादेवा, शिवरायांच्या शौर्याचा जन्म प्रत्येक हिंदूच्या हृदयात होऊ दे, त्या शिवशक्तीचा जन्म आम्हा प्रत्येकाच्या हृदयात होऊन आणि देव मस्तकी धरून संपूर्ण हिंदुस्थानात हलकल्लोळ करून हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर होऊ दे, अशी आम्ही सर्व तुमच्या चरणी साकडे घालत आहोत.
हिंदु युवकांनो, आपल्या कृतीत छत्रपती शिवाजी महाराज पाहिजेत !
वयाच्या केवळ १६ व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले. मूठभर मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची संकल्पना दिली. हिंदवी स्वराज्यासाठी मूठभर मावळ्यांनी जिवाची पर्वा न करता स्वत:ला झोकून दिले. ५ पातशाहींच्या विरोधात लढत एक-एक प्रदेश जिंकला. केवळ काही वर्षांच्या कालावधीत विजापूर आणि देहली या राजसत्तांना पाणी पाजले. वर्ष १६७४ मध्ये गुरु समर्थ रामदास स्वामी यांच्या मार्गदर्शनानुसार महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची घोषणा करून स्वत:चा राज्याभिषेक करवून घेतला आणि हिंदु धर्माला राजसिंहासन प्राप्त करून दिले. छत्रपती शिवरायांना आपले भाग्यविधाते म्हणून स्वराज्याची जनता पाहू लागली. काही जण तर त्यांना हिंदू पातशहा, हिंदु सम्राट म्हणू लागले. शिवरायांनी वेद, पुराण आणि मंदिरांचे रक्षण केले अन् हिंदूंच्या जीभेवरील रामनाम राखून धरले.
आमची मंदिरे, गोमाता आणि हिंदु महिला या तीन महत्त्वाच्या स्रोतांवर मोगलांनी आघात केले अन् त्यांचा महाराजांनी निःपात केला. देव, देश आणि धर्म यांचे रक्षण करून शिवरायांनी आई भवानीमातेच्या आशीर्वादाने हिंदवी स्वराज्य स्थापले. आजही या शक्तीस्रोतांवर सर्वत्र आघात होत आहेत; पण आता कोण थांबवणार ? शिवराय घडवण्यासाठी जिजाऊमाता होत्या. आज घराघरात छत्रपती शिवराय हवेत; पण जिजामाता ?
छत्रपती शिवाची महाराज आमच्या मनात, विचारात, हृदयात आणि जीवनात आहेत; पण आमच्या कृतीत कधी ? विचार करू नका, हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात प्रत्यक्ष कृतीच्या स्तरावर सहभागी व्हा आणि हिंदवी स्वराज्य अर्थात् हिंदु राष्ट्र स्थापनार्थ सिद्ध व्हा !
जय भवानी ! जय शिवाजी !!
श्रीगुरुचरणी अर्पण,
– श्री. सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती (१०.०३.२०२१)