कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे येथील सिनेमा, नाटक चालू; परंतु सांस्कृतिक कार्यक्रम रहित !

पुणे, २१ मार्च – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकारने सध्या नाट्यगृहांमध्ये तसेच मल्टिप्लेक्समध्ये आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने प्रयोग करण्यास अनुमती दिली आहे; परंतु त्याच जागी नियम पाळून सांस्कृतिक किंवा सामाजिक कार्यक्रम तसेच व्याख्याने घेण्यास बंदी घातली आहे. कार्यक्रम घेतल्यास सभागृह आणि आयोजक संस्था यांच्यावर कारवाई होईल, असे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे थिएटरमध्ये ५० टक्के आसन क्षमतेने नाटकांचे प्रयोग आणि चित्रपटांचे प्रदर्शन चालू आहे. त्यामुळे कार्यक्रमांना वेगवेगळे नियम का, असा प्रश्‍न विचारला जात आहे. यावर महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी निर्माण झालेल्या गोंधळाविषयी फेरविचार करून निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.