वैद्यकीय कर्मचार्‍यांवरील आक्रमणाच्या विरोधातील कारवाईमधील त्रुटी शोधण्यासाठी शासन तज्ञांची समिती स्थापन करणार

मुंबई – उपचाराच्या वेळी रुग्णांच्या नातेवाइकांकडून भावनेच्या भरात अनेकदा रुग्णाचा मृत्यू झाल्यास किंवा अप्रिय घटना घडल्यास रुग्णालयाची तोडफोड केली जाते. काहीवेळा उपस्थित आधुनिक वैद्य आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्यावर आक्रमण केले जाते. वैद्यकीय सेवा कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई केली जाते; मात्र सध्या ही तरतूद पुरेशी नाही. यांतील त्रुटी शोधण्यासाठी लवकरच तज्ञ समितीची नियुक्ती करण्यात येईल, अशी माहिती १७ मार्च या दिवशी राज्यशासनाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यावर होणारी आक्रमणे रोखण्याविषयी न्यायालयाने हस्तक्षेप करावा, याविषयी डॉक्टर राजीव जोशी यांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपिठापुढे ही सुनावणी झाली. यावरील पुढील सुनावणी ३१ मार्च या दिवशी होणार आहे.