पुणे, १४ मार्च – येथील अनेक ठिकाणी सामाजिक अंतराच्या नियमांचे उल्लंघन करत पी.एम्.पी.एम्.एल्.च्या बसेसमधून पुणेकर अगदी एकमेकांना चिटकून दाटीवाटीने उभे राहून प्रवास करतांनाचे चित्र दिसत आहे. अनेक बस तर अगदी प्रवाशांना दारात उभे रहाण्याची वेळ येईपर्यंत भरल्या जात आहेत. बसमधील आसनक्षमता पूर्ण भरल्यानंतर स्टॅण्डींगने प्रवासी घेण्यासंदर्भातील कोणतेच नियम पाळले जात नाहीत. बसच्या मधल्या पॅसेजपासून ते दोन्ही दरवाजांपर्यंत सगळीकडे प्रवासी जवळजवळ उभे राहून प्रवास करतांना दिसतात.
अनेक ठिकाणी खासगी गाड्यांची आणि दुचाकीस्वारांनी मास्क घातले आहे की, नाही याची पडताळणी करण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असला तरी सार्वजनिक बस वाहतुकीकडे पोलिसांचेही दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. पुण्यामध्ये सध्या पी.एम्.पी.एम्.एल्.च्या बसेसची सेवा वगळता इतर सार्वजनिक वाहतुकीचा चांगला पर्याय उपलब्ध नसल्याने कामाला जाणार्या पुणेकरांकडे या बसेसशिवाय इतर कोणताही पर्याय नाही. त्यामुळेच या बसमध्ये अशापद्धतीने नियमांचे उल्लंघन करुन, कोरोना संसर्गाचा धोका पत्करून प्रवास करावा लागतोय. (कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतुकीचे अन्य पर्यायही उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. – संपादक)